चोपडा येथील कुंटणखान्यातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 06:04 PM2020-01-14T18:04:00+5:302020-01-14T18:05:24+5:30
कुंटणखाना चालत असलेल्या भागातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत आली आहे.
चोपडा, जि.जळगाव : येथील धरणगाव रस्त्यावर हतनूर उजव्या कालव्याला लागून असलेल्या हतनूर प्रकल्पाच्या जागेवरील कुंटणखाना चालत असलेल्या भागातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत आली आहे. हतनूर विभागाने जेसीबीद्वारे हे अतिक्रमण मंगळवारी काढले.
हतनूर प्रकल्पाच्या जमिनीवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अतिक्रमित घरे, झोपड्या उभारून कुंटणखाना सुरू होता. याविषयी वारंवार विविध विभागांकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन काही कारवाया यापूर्वीही केल्या आहेत. परंतु १४ जानेवारी रोजी हतनूर पाटबंधारे विभागाच्या चोपडा कार्यालयाने कालव्या लगत असलेल्या या जमिनीवरील अतिक्रमण केलेली २५ घरे जेसीबी लावून जमीनदोस्त करून सुमारे १० हजार चौरस फूट जागा मोकळी केली. कुंटण खाण्याच्या अतिक्रमित झोपड्यांवर आत्मा विभागाकडून संक्रांत आली.
हतनूर पाटबंधारे विभागातर्फे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या वेश्यांना यापूर्वी तीन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही त्यांनी जागा खाली न केल्याने दंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याचे शाखा अभियंता पी. बी.पाटील यांनी सांगितले. या कारवाईत उपविभागीय अभियंता ए. जे.निकम, शाखा अभियंता पी.आर. सोनवणे यांच्यासह २० कर्मचारी उपस्थित होते.
याकामी स पो.नि. मनोज पवार यांच्यासह २६ पुरुष व ३ महिला पोलीस कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
जागेचे प्रतिदिन भाडे रुपये एक हजार@
वेश्या व्यवसायासाठी बाहेरून आलेल्या महिलांनी याठिकाणी उभारलेल्या झोपड्यांंमध्ये व्यवसाय सुरू केला होता. यातील बºयाच वेश्यांना झोपड्या, पत्र्याची घरे ही स्थानिक लोकांनी बांधून दिली. त्यांना प्रति दिवस एक हजार रुपये भाडे द्यावे लागत होते, असेही घटनास्थळी समजले. यामागे मोठे अर्थकारण होत असल्याने तसेच गुंडगिरी फोफावत असल्याने त्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याने शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.
कुंटणखान्यातील महिला घरातील साहित्य काढून वाचविण्याचा प्रयत्न करत होत्या. काही महिलांनी रिक्षामध्ये घरातील साहित्य टाकून दुसरीकडे हलवण्यासाठी धावपळ केली. मात्र हतनूर विभागाकडून तोडण्यात आलेली घरांचे पत्रे जेसीबीने संपूर्ण नेस्तनाबूत करण्यात आले. केवळ भंगारमध्ये ते पत्रे विकले जातील, या स्वरूपाचे करून पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, यासाठी हतनूर विभागाचे अधिकारी सतर्क राहणार आहेत.
गेल्या ३५-४० वर्षांपासून ही वस्ती या ठिकाणी वसलेली होती. यामुळे अनेक घटनाही घडलेल्या होत्या. परंतु आता या विभागाने पोलीस संरक्षणात केलेल्या थेट कारवाईमुळे आता ही वस्ती मात्र याठिकाणी नष्ट करण्यात आलेली आहे.