चोपडा, चाळीसगावात दोन दिवस निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:08+5:302021-03-13T04:28:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने चोपडा, चाळीसगाव नगरपालिका हद्दीत शनिवारी १३ ते १४ मध्यरात्री बारा पर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने चोपडा, चाळीसगाव नगरपालिका हद्दीत शनिवारी १३ ते १४ मध्यरात्री बारा पर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. दूध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापनाशी संबधित घटक वगळून सर्व बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरूवारी सायंकाळी काढले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून जळगाव शहराबरोबरच चाळीसगाव व चोपडा या ठिकाणीही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. जळगाव शहरात १५ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यासह आता चोपडा व चाळीसागवातील संसर्गाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी १३ मार्चच्या मध्यरात्री ००.०१ वाजेपासून ते १४ मार्चच्या मध्यरात्री २४.०० वाजेपर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व आपत्ती व्यवस्थापनक कायदा, २००५ अन्वये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हे निर्बंध लावले आहे. कोविड विषाणूमुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी चोपडा, चाळीसगाव, अमळनेर या नगरपालिकांच्या हद्दीत निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.
आदेशांचे उल्लंघन आणि शिक्षा
या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही बाब भारतीय दंड संहिता १८६०(४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहिल.
हे असेल बंद
सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार
किराणा दुकाने, नॉन इंसेशियल सर्व दुकाने
किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी, विक्री केंद्रे
शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये
हॉटेल, रेस्टॉरंट (होम डिलिव्हरी पार्सल वगळता)
सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम
शॉपींग मॉल्स, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप
गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रीडा स्पर्धा, प्रर्दशन, मेळावे, संमेलने
पान टपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रीची ठिकाणे
हे असेल सुरू
दूध विक्री केंद्रे
वैद्यकीय उपचार व सेवा
औषध विक्री दुकाने
आपत्ती व्यवस्थापाशी संबधित घटक
परीक्षा असल्यास परीक्षार्थी व नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना या निर्बधांतून सूट देण्यात आली आहे.
दहा दिवसात आढळलेले रुग्ण
चोपडा : ७१०
चाळीसगाव : ५५७
ॲक्टीव्ह केसेस
चोपडा : ७१०
चाळीसगाव : ४३७