फॅशनेबल नंबर प्लेट व पैशांच्या उधळपट्टीने फोडले जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचे बींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 04:08 PM2018-04-12T16:08:01+5:302018-04-12T16:08:01+5:30
वारंवार दुचाकी बदल करणे, दुचाकीवर फॅशनेबल नंबर टाकणे तसेच पैशाची अमाप उधळपट्टी या कारणामुळे दुचाकी चोरट्यांचे बींग फुटले आहे. महिनाभराच्या निरीक्षणानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळंबा (ता.चोपडा) येथील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : वारंवार दुचाकी बदल करणे, दुचाकीवर फॅशनेबल नंबर टाकणे तसेच पैशाची अमाप उधळपट्टी या कारणामुळे दुचाकी चोरट्यांचे बींग फुटले आहे. महिनाभराच्या निरीक्षणानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळंबा (ता.चोपडा) येथील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दररोज पार्टी, महागडे कपडे, दारु अन् मौजमस्ती
१.चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील शरद दिलीप दिलीप कोळी (वय २४), रवींद्र नथ्थू कोळी (२७) व अजय नंदलाल कोळी (वय २२)अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हे तिघं जण सतत नवनवीन दुचाकी बदल करतात व त्यावर आकर्षक तसेच फॅशनेबल क्रमांक टाकून चोपडा तालुक्यात वावरतात.
२.दररोज पार्टी, महागडे कपडे, दारु व मौजमस्ती यावर पैशाची अमाप उधळपट्टी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे सूरज पाटील या कर्मचाºयाला तिन्ही तरुणांची कुंडली काढण्याच्या सूचना करुन महिनाभर त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या.
३.एकाच दुचाकीवर दररोज वेगवेगळे क्रमांक टाकले जात असल्याची खात्री झाल्यानंतर सूरज पाटील, सुशील पाटील, मनोज दुसाने, योगेश वराडे, रवी चौधरी, गफूर तडवी, इद्रीस पठाण, रामचंद्र बोरसे व बापू पाटील यांनी बुधवारी रात्री कोळंबा गावात सापळा लावून तिघांच्या मुसक्या आवळल्या.