चोसाका भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 09:19 PM2019-08-13T21:19:07+5:302019-08-13T21:19:34+5:30
शेतकरी, कामगारांचे पैसे देण्याच्या अटींवर निघाला तोडगा
चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी, कामगार यांचे पैसे थकल्याने याबाबत काही महिन्यांपासून चर्चा, पत्रकार परिषदा, आंदोलने झाली. अखेर त्यावर तोडगा निघाला. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय १३ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
चोसाकावर असलेल्या प्रचंड आर्थिक कर्जामुळे वित्तीय संस्थांकडे चोसाका ची पत संपुष्टात आली. तसेच संचालक मंडळ कारखाना स्वत: सुरू करू शकत नसल्याने कारखाना भडेतत्त्वावर देण्याचा एकमेव पर्याय चोसाकासाठी होता. त्यासाठी चोसाकाने हा एकमेव विषय घेऊन शेतकरी सभासदांची तत्काळ सर्वसाधारण सभा बोलावली होती. त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पैसे व कामगारांचे थकीत पगार देण्याच्या अटीवर व भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आधीच्या कामगारांना कायम ठेवण्याच्या अटीवर चोसाका भाडेतत्त्वार देण्याचा ठराव शेतकरी सभासदांनी मंजूर केला.
सर्वसाधारण सभा १३ रोजी दुपारी १ वाजता चहार्डी येथील कारखाना साईटवर चेअरमन अतुल ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील, माजी चेअरमन डॉ.सुरेश पाटील, अॅड.घनश्याम पाटील, पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी उपस्थित होते.
दरम्यान, सभासदांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यात चर्चेचे रूपांतर वादविवादात झाले. एस.बी.पाटील यांनी भाडेतत्वावर कारखाना देण्याआधी शेतक?्यांचे पैसे, कामगारांचे थकीत पगार आणि याच कामगारांना पुढे नियमित ठेवावे. त्याबरोबरच भाडेतत्वावर दिल्यानंतर पाच जाणकार शेतक?्यांना सोबत घेऊन पुढील निर्णय चेअरमन व संचालक मंडळाने घ्यावा, असे सुचविले. त्यावर माजी चेअरमन अॅड. घनश्याम पाटील यांनी मध्यस्थी करून शेतक?्यांनी कारखाना भाडेतत्वावर देण्यास होकार दिला.
यावेळी व्यसपीठावर संचालक आनंदराव रायसिंग, जिल्हा दूध संघाचे संचालक ए.डी.चौधरी, शेतकी संघाचे शेखर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी पाटील, विजय पाटील, श्यामकांत पाटील, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, गोपाळ धनगर, प्रकाश रजाळे, डॉ.पांडुरंग सोनवणे, भरत पाटील, अनिल पाटील, प्रवीण गुजराथी यांच्यासह तालुक्यातील संस्थांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव आधार पाटील यांनी केले, तर आभार चेअरमन अतुल ठाकरे यांनी मानले. प्रभारी कार्य संचालक अकबर पिंजारी, ललित महाजन आदींनी परिश्रम घेतले.