जळगावात नाताळाचा उत्साह : प्रभू येशूंच्या जन्माने आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:11 PM2018-12-25T12:11:40+5:302018-12-25T12:12:12+5:30
चर्चमध्ये विविध कार्यक्रम
जळगाव : जगभरात वेध लागलेल्या नाताळ (ख्रिसमस) सणानिमित्त जळगावातही ख्रिस्तीबांधवांच्यावतीने या सणाची जोरदार तयारी करण्यात आली असून सर्वच चर्चही सजले आहेत. २४ रोजी मध्यरात्री प्रभू येशू यांचा जन्म झाला आणि समाजबांधवांच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, भाविकांच्या दर्शनासाठी मंगळवारी चर्च दिवसभर खुले राहणार आहेत.
नाताळ सणाच्या तयारीची लगबग गेल्या १० दिवसांपासून सुरू होती. यामध्ये चर्चची सजावट करण्यात येऊन विविध देखावे साकारण्यात आले आहे. या सोबतच शहरातील चर्चतर्फे भक्ती, प्रार्थना, उपासना यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़
शहरात मेहरूण तलावानजीक सेंट थॉमस चर्च, रामानंद नगर रस्त्यावरील सेंट फ्रॅन्सिस डी. सेल्स चर्च, पांडे डेअरी चौकातील सेंट अलायन्स चर्च असे तीन चर्च असून या चर्चमध्ये नाताळची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
२५ रोजी सकाळी रामानंद नगर रस्त्यावरील चर्चमध्ये प्रार्थना होणार असून समाजबांधव या निमित्ताने एकत्र येतील व एकमेकांना शुभेच्छा देतील.
दर्शनासाठी चर्च दिवसभर खुले राहणार असून सकाळच्या भक्तीनंतर रात्री १० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पांडे डेअरी चौकातील अलायन्स चर्चमध्ये २५ रोजी सकाळी ९.३० वाजता उपासना, संध्याकाळी साडेपाच नाताळ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. मेहरुण तलाव परिसरातील सेंट थॉमस चर्चमध्येही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पांडे डेअरी चौकातील चर्चमध्ये कार्यक्रम
पांडे डेअरी चौकातील चर्चमध्ये २२ डिसेंबरपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. २८ रोजी संध्याकाळी ७ वाजता तरु ण संघातर्फे कार्यक्रम, २९ रोजी दुपारी २ वाजता खेळ, ३० रोजी संध्याकाळी ५ बायबल क्वीज, ३१ रोजी सकाळी ९.३० वाजता उपासना, रात्री ८ ते १० वाजेदरम्यान कॅप फायर, रात्री १० ते १२ वाजेदरम्यान वॉच नाईट सर्विस (साक्ष व प्रार्थना), तर १ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता नूतनवर्ष उपासना, प्रभू भोजन व अर्पण असे कार्यक्रम होतील.
जन्मोत्सवानंतर दिल्या शुभेच्छा
शहरातील चर्चमध्ये जन्मोत्सवाचा देखावा उभारण्यात येऊन २४ रोजी रात्री १२ वाजता प्रभू येशूंचा जन्म झाल्याचे जाहीर करण्यात आले आणि समाजबांधवांनी आनंदोत्सव साजरा करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
ख्रिसमस गितांची रंगत
ख्रिसमस गीतांचा ‘ग्लोरिया नाईट’ हा रंगतदार कार्यक्रम झाला. यात प्रभू येशूंच्या जीवनावरील व इतर गीत सादर करण्यात आली. सर्व चर्चमध्ये प्रभू येशू यांच्या जन्माचा देखावा उभारण्यात येऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. भक्ती, प्रार्थना असे कार्यक्रम होऊन केक कापण्यात आला. ख्रिसमस क्रिबसह ख्रिसमस ट्री साकरण्यात आले.