चक्क आमदारांचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 02:59 PM2021-02-03T14:59:40+5:302021-02-03T15:00:31+5:30
चक्क आमदारांचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. ही घटना विदर्भ एक्सप्रेसमध्ये घडली.
भुसावळ : कोरोना काळामध्ये चोरट्यांची एक्सप्रेस सुसाट असून, याचा प्रत्यक्ष अनुभव आमदार संजय सावकारे यांना आला. विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना एकाने मोबाईल चेक करण्याच्या बहाण्याने चक्क मोबाईल घेऊन पळ काढला. आमदारांनी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताच यंत्रणा कामाला लागली व चोरीला गेलेला मोबाईल मिळविण्यास पोलिसांना यश आले.
धावत्या गाडी तसेच स्थानकावर उभे असलेल्या गाड्यांमध्ये चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापूर्वी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याही सामानाची गाडीमधून चोरी झाली होती. भुसावळचे आमदार संजय सावकारे गाडी क्रमांक ०२१०५ अप विदर्भ गोंदिया एक्सप्रेस एसी एक बर्थ क्रमांक -३९ वरून प्रवास करीत असताना एक युवक आला व मोबाईल चेक करायचे सांगत ९० हजार किमतीच्या आमदाराचा मोबाईल हिसकावून पळ काढला. मोबाईल गेला म्हणजे यंत्रणा थांबते. हा प्रत्येकाचा अनुभव असून आमदार सावकारे क्षणाचाही विलंब न करता चोरट्या मागे धावले, मात्र तो पसार होण्यास यशस्वी झाला. सावकारे यांनी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यंत्रणा लागली कामाला
चक्क आमदाराच्या मोबाईलवर चोरट्यांनी हात घातल्यामुळे आमदारांच्या अस्तित्वाचा विषय उपस्थित होतो. याबाबत लोहमार्ग पोलिसांनी तक्रार नोंदविताच संपूर्ण यंत्रणा कामाला लागली व अवघ्या काही तासातच चोरीस गेलेला मोबाईल शोधण्यात यंत्रणेला यश मिळाले.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी याबाबत तपास यंत्रणा फिरवली. रेल्वे रुळावर असलेल्या एका तृतीय पंथीयाकडे आमदाराचा मोबाईल आढळला.
काम लोहमार्ग पोलिसांचे, पण ते केले बाजारपेठ पोलिसांनी
प्रत्यक्षात लोहमार्ग पोलिसांची जबाबदारी असताना त्यांना यामध्ये अपयश आले. तेच काम बाजारपेठ पोलिसांनी चक्रे फिरवून मार्गी लावले.