शासकीय कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:17 AM2021-04-07T04:17:32+5:302021-04-07T04:17:32+5:30
जळगाव : कोरोनाच्या सततच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता शासकीय कार्यालयात देखील प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नागरिकांना अत्यावश्यक ...
जळगाव : कोरोनाच्या सततच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता शासकीय कार्यालयात देखील प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नागरिकांना अत्यावश्यक काम असेल किंवा बैठकीसाठी बोलावले असेल त्यांनी ४८ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे सक्तीचे आहे. तसेच सर्व बैठका ऑनलाईन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी संबंधित अभ्यागतांना त्यांचे अर्ज, प्रकरणे, वैयक्तिक निवेदन, खुलासा प्रत्यक्ष कार्यालयात सादर न करता शक्यतो संबधित विभागाच्या ई-मेलवर सादर करावेत. कोणीही नागरिक थेट कार्यालयात येणार नाही. याची सर्व कार्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी व त्याबाबत नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कार्यालयात येणारे टपाल हे एकाच ठिकाणी देण्यात यावे. अन्य कोणत्याही शाखेत प्रत्यक्ष टपाल स्वीकारले जाणार नाही.
ज्यांना अत्यावश्यक कामासाठी कार्यालयात उपस्थित रहायचे आहे.त्यांना व्हिजीटर पास दिला जाईल. आणि त्यासाठी त्यांनी ४८ तास आधी केलेल्या कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय प्रवेश पास दिला जाणार नाही. प्रत्यक्ष बैठकीला संबंधित विषयाचे एकच अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहेत.