हल्लेखोर बिबटय़ाला नागरिकांनी हुसकावले, मात्र महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 05:12 PM2017-09-26T17:12:28+5:302017-09-26T17:21:47+5:30
चाळीसगाव तालुक्यातील घटना
ऑनलाइन लोकमत उंबरखेड, ता.चाळीसगाव, जि.जळगाव, दि.26 : बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात भारती सतीश देवकर (वय 25) ही महिला जखमी झाल्याची घटना पिंपळवाड-म्हाळसा, ता.चाळीसगाव येथे मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. दरम्यान, हल्लेखोर बिबटय़ाला सोबत असलेल्या नागरिकांनी हुसकावून लावल्याने ही महिला बचावली. बिबटय़ाने नागरी वस्त्यांमध्ये हल्ला करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. गेल्या आठवडय़ात अलका गणपत अहिरे यांचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या आठवणी ताज्या असतानाच बिबटय़ाने पुन्हा भारती देवकर या महिलेवर शेतात हल्ला केला. ही महिला स्वत:च्या कपाशीच्या शेतात निंदणी करीत असताना ही घटना घडली. बिबटय़ाने छलांग मारून महिलेचा गळा पकडला व तिच्या दंडाला चावा घेतला. सुदैवाने या वेळी हजर असलेल्या इतर महिलांनी धाडस दाखविले व बिबटय़ावर दगड मारून त्याला हाकलून लावले. यामुळे बिबटय़ाने तेथून पळ काढला. या घटनेत ही महिला जखमी झाली असून, उपचारार्थ चाळीसगाव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी बिबटय़ाने हल्ला करून 40 हजार रुपये किमतीचा बैल, यानंतर दुस:या दिवशी म्हशीच्या पारडूवर हल्ला केला. बिबटय़ाच्या सातत्याने होत असलेल्या हल्ल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. वनविभागाने बिबटेाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.