खाजगी डॉक्टरांवरील कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 08:24 PM2021-04-17T20:24:24+5:302021-04-17T20:26:41+5:30

प्रशासकीय अधिकारी रुग्णालय तपासणीसाठी आल्याने परिसरातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी करून अधिकाऱ्यांना जाब विचारला.

Citizens outraged by action against private doctors | खाजगी डॉक्टरांवरील कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच घेराव

खाजगी डॉक्टरांवरील कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच घेराव

Next
ठळक मुद्देजामनेरला अधिकाऱ्यांना विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : जुना बोदवड रोडवरील एका खाजगी डॉक्टरने रुग्णाची कोरोना चाचणी न करता त्याच्यावर उपचार करून सलाइन लावल्याच्या तक्रारीवरून शनिवारी तहसीलदार व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या डॉक्टरांना सूचना दिली. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी रुग्णालय तपासणीसाठी आल्याने परिसरातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावरून काही काळ गोंधळ उडाला होता.

आरोग्य विभागाने तळेगाव येथील ३ व नेरी दिगर येथील एका डॉक्टरवर गेल्या आठवड्यात कारवाई केल्यानंतर आज शहरातील ५ रुग्णालयांची याच कारणावरून तपासणी करण्यात आली. तहसीलदार अरुण शेवाळे, उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. जयश्री पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व पालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जुना बोदवड रोडवरील रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या डॉक्टरांनी शहरातील एका रुग्णावर उपचार करून सलाइन लावले. तो कोरोनाबाधित आढळला.

रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांनी रुग्णांची कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. चाचणी न करता जास्त प्रमाणात सलाइन लावू नये व शासन नियमांचे पालन करावे.

-अरुण शेवाळे, तहसीलदार जामनेर

भरमसाठ पैशांची होते मागणी

खाजगी रुग्णालयात कोरोना नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नकार दिला जात आहे, तर काही रुग्णालयांत भरमसाठ पैशांची मागणी केली जाते. यास्थितीत गरिबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासनाने कारवाई करू नये, अशी मागणी या भागातील नागरिकांनी तहसीलदारांकडे केली.

कोरोना संकटकाळात गोरगरीब आर्थिक संकटात सापडला आहे. किरकोळ आजारावर उपचार करण्यास काही डॉक्टर नकार देतात, तर काहींकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. त्यामुळे गोरगरिबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासनाने कारवाई करू नये.

-जमील पठाण, रहिवासी, जामनेर

Web Title: Citizens outraged by action against private doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.