नागरिकांनी आमदारांसमोर वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 01:54 PM2021-07-09T13:54:36+5:302021-07-09T13:57:01+5:30
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी नऊ गावांमध्ये ''आमदार आपल्या दारी' उपक्रमास सुरुवात
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर : 'आमदार आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील नऊ गावांमध्ये प्रशासनासह हजर अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थ व आदिवासींनी मोठ्या प्रमाणावर समस्यांचा पाढा वाचला. या दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्याचक्षणी समस्या या विभागाची असेल ती कशी सोडवण्यात येईल यासंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी दिरंगाई अथवा हेतुपुरस्सर काम केले जात नसेल त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवर धरत बैठकीतच तंबी देण्यात आली.
आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी आय बी शेख, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, आफसरखान, सरपंच सूर्यकांत पाटील, शिवा पाटील इच्छापूर, रुपेश पवार, ग्राम पंचायत सदस्य जनुकाबाई, वैद्यकीय अधिकारी नीलेश पाटील, डॉ. मधुकर तोडासाम, प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, पंकज पांडव, नवनीत पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, सरपंच गणेश थेटे, उपसरपंच प्रमोद इंगळे, गटनेते राजेंद्र हिवराळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते तथा ग्रामस्थ नागरिक व विविध गावचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आरोग्य वनविभाग कृषी बँक आदिवासी विकास यासह संपूर्ण तालुक्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.
संपूर्ण विभागाचा सर्वप्रथम आढावा घेऊन त्यानंतर ग्रामस्थांच्या समस्या काय आदिवासींचे विविध योजना व अडचणी यांना कसे निराकरण करण्यात येईल यासंदर्भात आमदार पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. विशेष म्हणजे सामाजिक सामंजस्याने प्रश्न सोडवण्यासंदर्भात विचारविनिमयदेखील करण्यात आला. तहसीलदार श्वेता संचेती यांनीदेखील प्रसंगी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.