धूळ अन् धुराने त्रस्त असलेले नागरिक अखेर उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:30+5:302021-03-06T04:15:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील खराब रस्त्यांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे जळगावकर अक्षरश त्रस्त झाले आहेत. त्यातच अनेक वर्षांपासून बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील खराब रस्त्यांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे जळगावकर अक्षरश त्रस्त झाले आहेत. त्यातच अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्याला लागलेल्या आगीमधून निघणाऱ्या धुरामुळेदेखील शहरातील अनेक भागात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षांपासून धूळ अन् धुरामुळे त्रस्त असलेल्या जळगावकरांचा अखेर संयम सुटला असून, शुक्रवारी सकाळी १० वाजता पवार पार्क, चंदू अण्णा नगरातील रहिवाश्यांनी घनकचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या मनपाच्या घंटागाड्या व इतर वाहने अडविली, तसेच जोपर्यंत धूळ व धुराचा त्रास कमी करण्याबाबत उपाययोजना होणार नाही, तोवर वाहने सोडण्यास रहिवाश्यांनी नकार दिला.
शहरातील पवार पार्क व चंदु अण्णा नगर भागाकडून दररोज घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी जाणारी वाहने, बायपासच्या कामासाठी व वाळू उपसा करणारी शेकडो वाहने ये-जा करतात, त्यातच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याने वाहने गेल्यावर रस्त्यावरून उडणारी धूळ थेट घरात जाते. त्यातच घनकचरा प्रकल्पाकडे जाणारी अनेक वाहने रस्त्यालगत कचरा टाकत जातात. यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक हा त्रास सहन करीत आहेत. शुक्रवारी नागरिकांचा संयम सुटला व सकाळी १० वाजता घनकचरा प्रकल्पाकडे जाणारी सर्व वाहने या भागातील महिला व युवकांनी अडवून ठेवली.
२४ तास घराचा दरवाजा ठेवावा लागतो बंद
दिवसा असो वा रात्री २४ तास धूळ व धुरामुळे घराचा दरवाजा बंद ठेवावा लागत असल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. सकाळी रस्त्यावरची धूळ घरांमध्ये जाते, तर रात्रीच्या वेळेस घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे निघणारा धूर घरांमध्ये जातो. यामुळे घरात थांबणेही कठीण झाले आहे. मनपाकडून रस्त्याचीही दुरुस्ती केली जात नाही. दुसरीकडे धुराबाबतदेखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. स्थानिक नगरसेवक व मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याचेही रहिवाश्यांनी सांगितले.
अन्यथा घरं विक्री करून गावाकडे परतावे लागेल
या भागात घर घेतल्यानंतर ही समस्या दररोज सहन करावी लागत आहे. आता ही समस्या जर कायम राहिली तर या भागातील सर्वांना घरं विक्री करून इतरत्र किंवा पुन्हा गावांमध्ये स्थायिक व्हावे लागेल, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
वाहने न सोडल्यास गुन्हा दाखल करू, नगरसेविका पतीची धमकी
नागरिकांनी मनपाच्या वाहनांसह बायपासच्या कामासाठी जाणारी वाहनेदेखील रोखून धरली. रस्त्याचा दोन्ही बाजूस १० ते १५ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांनी वाहने सोडण्यास नकार दिला. यामुळे भाजप नगरसेविका गायत्री राणे यांचे पती इंद्रजीत राणे यांनी स्थानिक नागरिकांना वाहने सोडा, अन्यथा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. स्थानिक रहिवाश्यांनी वाहने सोडण्याआधी रस्त्यावर पाणी तरी मारा, अशी मागणी केली. शाब्दीक वादानंतर अखेर राणे यांनी रस्त्यावर पाणी मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर ती वाहने सोडण्यात आली.
सहायक आयुक्तांकडे मांडली गाऱ्हाणी
घंटागाड्या व मनपाची इतर वाहने नागरिकांनी अडवून घेतल्यामुळे सहायक आयुक्त पवन पाटील यांनी याठिकाणी जावून नागरिकांची बाजू ऐकून घेतली; मात्र संतप्त नागरिकांनी जोपर्यंत कचऱ्याच्या धुरावर बंदोबस्त करत नाही, तोपर्यंत वाहने सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. स्वच्छ भारती सर्वेक्षण समन्वयक महेंद्र पवार यांनी मध्यस्थी करत नागरिकांची समजूत काढली, तसेच दोन दिवसात जर रस्त्याच्या धुळीपासून व कचऱ्याच्या धुराच्या समस्येवर तोडगा काढला नाही तर रस्त्यावरचा कचरा मनपासमोर पेटवून एकही वाहन कचरा प्रकल्पात जावू देणार नाही, असा इशारा रहिवाश्यांनी दिला. मनपा प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर सुमारे २ तासानंतर सर्व वाहने नागरिकांनी सोडली.