जळगावात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 10:43 PM2020-07-05T22:43:57+5:302020-07-05T22:46:11+5:30
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानांवर गर्दी
जळगाव : शहरात ७ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केल्यानंतर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारी सकाळपासून जळगावकरांनी मोठी गर्दी केली. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचेही व्यवहार बंद राहणार असल्याने या वस्तूंच्याही खरेदीसाठी गर्दी उसळली होती़ सुभाष चौक परिसर, चित्रा चौक, गणेश कॉलनी, बळीराम पेठ, भिलपुरा चौक, टॉवर चौक, गिरणा टाकी परिसर तसेच विविध किराणा दुकांनावर गर्दी झाली होती.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊनची घोषणा झाली व जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर व्यवहार थांबले होते. मात्र त्यानंतर जून महिन्यापासून टप्प्या-टप्प्याने व्यवहार सुरू झाले. मात्र हे होत असताना रस्त्यांवरील गर्दीवर नियंत्रण नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला. त्यामुळे आता पुन्हा ७ जुलैपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वेळच्या लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तूंचेदेखील व्यवहार बंद राहणार असल्याने मार्च महिन्याप्रमाणेच आता पुन्हा शहरात ठिकठिकाणी खरेदीसाठी गर्दी उसळली. तसे पाहता शनिवार, ४ जुलै रोजी लॉकडाऊनसंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्णय जाहीर केला. ही वार्ता सोशल मीडियावर पसरताच शनिवार दुपारपासून बाजारपेठेत गर्दी सुरू झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुकानांची वेळ असल्याने अनेकजण खरेदीविना माघारी परतले. मात्र रविवार सकाळपासून पुन्हा बाजारपेठेत गर्दी सुरू झाली.
साठा करून ठेवायला प्राधान्य
मुळात महिनाभराचा किराणा सामान खरेदी करायचा काळ असल्याने त्यादृष्टीने ग्राहकांचे नियोजन होतेच. त्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्याने जे नंतर खरेदी करणारे होते, तेदेखील बाजारपेठेत पोहचले. त्यामुळे गर्दीत अधिक भर पडत गेली. महिनाभर लागण्याऱ्या साहित्यापेक्षा अधिकचा साठा करण्यावर ग्राहकांनी भर दिला. या पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार सुरू होते. मात्र या वेळी हे व्यवहारही बंद राहणार असल्याने अधिक गर्दी झाली.
बटाट्याचे भाव वधारले
किराणा साहित्यासह भाजीपाला खरेदीसाठीही नागरिकांची गर्दी झाली. कांदे, बटाटे, लसण, आले या टिकावू वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात होती. बटाट्याला मागणी वाढल्याने त्याचे भाव थेट ४० रुपये प्रति किलोवर पोहचले.
फळ दुकानांवरही गर्दी
वेगवेगळ््याभागामध्ये मोठ्या प्रमाणात टरबूज, संत्रे, केळी तसेच अननस इत्यादी फळांचीदेखील खरेदी केली जात होती़ त्यामुळेया दुकानांवरही गर्दी झाली होती़
मेडिकल स्टोअर्सवर गर्दी
रविवारी सकाळपासून जवळपास सर्वच भागांमधील मेडिकल स्टोअर्सवर औषधी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली होती़ एक-एका दुकानावर पंधरा ते वीस जण खरेदी करतानाचे चित्र होते. तसे पाहता लॉकडाऊनमध्ये औषधी दुकाने सुरू राहणार आहेत, मात्र मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार अशा वेगवेगळ््या आजारांसाठीचे औषध खरेदी करून ठेवले. लॉकडाऊनदरम्यान औषधी खरेदीस मुभा असली तरी आपापल्या भागातच ती खरेदी करायची असल्याने व दुचाकीवर जाण्यासही मज्जाव असल्याने नागरिक अगोदरच औषधी साठा करून ठेवत असल्याचे चित्र आहे.