पोलिसांच्या अर्वाच्य भाषेने नागरिक संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:18+5:302021-07-04T04:13:18+5:30

सध्या सर्वत्र डेल्टा प्लस या रूपांतरित कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये लस टोचून घेण्यासाठी गर्दी ...

Citizens were outraged by the police language | पोलिसांच्या अर्वाच्य भाषेने नागरिक संतापले

पोलिसांच्या अर्वाच्य भाषेने नागरिक संतापले

Next

सध्या सर्वत्र डेल्टा प्लस या रूपांतरित कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये लस टोचून घेण्यासाठी गर्दी होत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चोपडा शहर आणि तालुक्यात लसीकरण लसीअभावी बंद होते. ३ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयात ३०० लस उपलब्ध होत्या. मात्र घेणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे नागरिकांनी लस टोचून घेण्यासाठी झुंबड केली. नागरिकांमध्ये प्रथम क्रमांकावरून चांगलीच वादावादी सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनाही या ठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यात चोपडा शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याने नागरिकांना अर्वाच्य भाषा वापरल्याने नागरिक चांगलेच संतापले. परंतु त्याचवेळेस उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. मनोज पाटील हे आल्याने त्यांनी ज्या नागरिकांना लस टोचून घेण्यासाठी संदेश मोबाइलवर गेलेला होता, अशा नागरिकांच्या यादीचे वाचन केले आणि त्यांना त्यांचा क्रमांकही सांगितला. त्यानंतर काही अंशी नागरिकांमध्ये झुंबड थांबली आणि संतप्त वातावरण निवळले. पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र सोनवणे, संतोष पारधी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या नागरिकांना समजावून मध्यस्थी केली. त्यामुळे वाद निवळला आणि लसीकरण सुरळीत सुरू झाले.

गेल्या सहा दिवसांनंतर ३ जुलै रोजी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीचे तीनशे डोस उपलब्ध झाले होते. सध्या डेल्टा प्लसच्या भीतीने नागरिकांमध्ये लस टोचून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणून प्रत्येक लसीकरण केंद्रावर गर्दी होत असून नागरिकांमध्ये झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. यावर शासनाने जास्तीत जास्त लसींचा पुरवठा करावा, अशी मागणीही नागरिकांनी केलेली आहे. यासोबतच लसीकरणाच्या केंद्राची संख्या वाढवून जास्तीत जास्त नागरिकांना लस टोचून घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

Web Title: Citizens were outraged by the police language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.