चोपडा शहरात सर्व कोविड हॉस्पिटल रुग्णांनी फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:08 PM2021-04-01T23:08:00+5:302021-04-01T23:08:07+5:30
चोपडा शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्स आणि उपजिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण उपचार घेत असल्याने फुल्ल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : चोपडा शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने हजारो रुग्णांना कवेत घेतले आहे. १ मार्च ते ३० मार्चच्या दरम्यान एकाच महिन्यात चोपडा तालुक्यात ५ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्स आणि उपजिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण उपचार घेत असल्याने फुल्ल झाले आहेत. नवीन रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. त्यातच नवीन १५० खाटांच्या प्रशासकीय इमारतीत नगरपालिकेच्या माध्यमातून कोविड हॉस्पिटल सुरू होणार असल्याने दिलासा मिळणार आहे.
प्रशासकीय नवीन इमारतीत १५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू झाल्याने सध्या ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही, अशा रुग्णांना तिकडे वर्ग करण्यात येत असल्याने वाढत्या रुग्ण संख्येमध्ये निश्चितच हे दिलासादायक ठरणार आहे. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी चोपडा तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७५ होती. मात्र १ ते ३० मार्च या एक महिन्याच्या कालावधीत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२६ झाली आहे.