शहर गारठले, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:57+5:302020-12-23T04:12:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत असून, गेल्या दोन दिवसांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत असून, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे वातावरण कोरडे आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना कोणतीही आडकाठी नसल्याने जिल्ह्याचा तापमानात मोठी घट झाली आहे. मंगळवारी जळगाव शहरात यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी म्हणजेच नऊ अंशांची नोंद करण्यात आली आहे. किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. ठिकठिकाणी नागरिक थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत.
यंदा थंडीचे आगमन ऑक्टोबर महिन्यातच झाले होते. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातदेखील थंडी गायबच होती. सध्या उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत तापमानात मोठी घट झाली आहे.
आठ दिवसात १९ अंशांची घट
गेल्या सहा दिवसांत किमान तापमानात तब्बल १० अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे किमान तापमानात वाढ झाली होती. आठ दिवसांपूर्वी किमान तापमान १९ अंशांवर होते. मात्र, मंगळवारी तापमान ९ अंशांपर्यंत खाली आहे. तसेच आगामी आठवडाभर तरी तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, कमाल तापमान फार काही घट झाली नसून, कमाल तापमान २९ ते ३१ अंशांवर स्थिर आहे.
रब्बीच्या पिकांना लाभ
कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कडाक्याचा थंडीमुळे रब्बी पिकांना जास्त पाणी भरण्याचे काम पडत नाही. गहू व हरभऱ्याचा वाढीसाठीदेखील थंडी उपयोगाची ठरत आहे. तालुक्यात रब्बी हंगामाची जवळ-जवळ १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
थंडी वाढण्याचे काय आहे कारण
आठवड्याभरात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमानात सारखी वाढ होती होती. मात्र, सोमवारी व मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. तसेच त्या वाऱ्यांचा वेग व प्रमाणदेखील जास्त असल्याने पुन्हा थंडीचे आगमन जिल्ह्यात झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
९ ते ११ किमी वेगाने वाहताहेत वारे
दोन दिवसांपासून जिल्ह्यात वाऱ्यांचा वेगदेखील वाढला आहे. जळगाव शहरात मंगळवारी ९ ते ११ किमी प्रतितास या वेगाने वारे वाहत असलेले पहायला मिळाले. दाब जास्त असल्याने वाऱ्यांचा वेग हा नेहमीच वाढत असतो. दरम्यान, अजून दोन दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून, त्यानंतर उत्तरेकडील वाऱ्यांच वेग मंदावणार आहे.
असे कमी होत गेले तापमान
तारीख - किमान तापमान
१७ डिसेंबर - १७ अंश
१८ डिसेंबर - १६ अंश
१९ डिसेंबर- १४ अंश
२० डिसेंबर- १२ अंश
२१ डिसेंबर- १० अंश
२२ डिसेंबर - ९ अंश