शहरातील बाजारपेठ, रस्ते पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:38+5:302021-03-29T04:10:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच होळी व धुलिवंदनच्या दिवशी नागरिकांची ...

City markets, roads fell dew | शहरातील बाजारपेठ, रस्ते पडले ओस

शहरातील बाजारपेठ, रस्ते पडले ओस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच होळी व धुलिवंदनच्या दिवशी नागरिकांची गर्दी होऊ शकते, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ३ दिवस कडक निर्बंधाची घोषणा केली. रविवारी पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह मुख्य रस्ते सकाळपासूनच ओस पडले होते. चौकाचौकांत तैनात असलेल्या पोलिसांकडून तुरळक येणाऱ्या वाहनधारकांची चौकशी केली जात होती. काम नसताना फिरणाऱ्यांना समज देवून परत पाठविण्यात येत होते.

शहरात वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २८ ते ३० मार्चदरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. रविवारी होळी तर सोमवारी धुलिवंदन साजरा केले जाणार आहे. हे दोन्ही सण आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने हे सण साजरे न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. तसेच खबरदारी म्हणून प्रशासनाने २८ ते ३० या दरम्यान कडक निर्बंध जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवेत दवाखाने व मेडिकल्स, शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह, दूधविक्री केंद्र तसेच कृषी क्षेत्रातील आस्थापना, अशा बाबींना यामध्ये सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या बाबींना प्रशासनाकडून सूट नसून कडक निर्बंध आहेत.

चौकाचौकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात पेट्रोलिंग सुरू आहे. ठिकठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत. मुख्य चौकांमध्ये तपासणी सुरू होती. पेट्रोलिंग दरम्यान, विनाकारण पायी फिरणारे नागरिक आढळून आले, तर त्यांना समज देऊन घरी पाठवण्यात येत आहे. दुसरीकडे महापालिकेची सहा पथकेदेखील जनता कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी तैनात करण्यात आली आहेत.

मुख्य रस्ते पडले ओस, बाजारपेठेतही शुकशुकाट

शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा बंद असल्याने सकाळपासून गजबज असणाऱ्या भागांमध्ये रविवारी सन्नाटा होता. महामार्गावर वाहतूक सुरू असली तरी शहरातील मुख्य रस्ते मात्र ओस पडले होते. महापालिकेसह शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी, मेडिकल व रुग्णालयासंदर्भातील काम असणारे नागरिक वगळता रस्त्यावर कुणीही नव्हते. सकाळी काही तरुण मंडळी मोटारसायकलवर फिरत होती. त्यांना चौकांमधील पोलिसांनी अडवून घरी परत जाण्याची समज दिली. पुन्हा कामानिमित्त रस्त्यावर दिसल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला.

वाढलेल्या तापमानामुळे झाली पोलिसांना मदत

तीन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, दुपारी उन्हाचा पारा वाढल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरात वाढलेल्या तापमानाने देखील लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला मदतच केल्याचे पहावयास मिळाले. मात्र, संध्याकाळी काही उपनगरांमध्ये नागरिकांची काही प्रमाणात गर्दी झाल्याचेही दिसून आले. तसेच दादा वाडी, खोटेनगर, निमखेडी परिसर, रामानंदनगर परिसर या भागात काही भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी यंदा होळी आपल्या घरातच साजरी केली.

Web Title: City markets, roads fell dew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.