शहरासाठी किमान दोन शासकीय डीसीएचसी हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:42+5:302021-03-19T04:15:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मध्यम प्रकृती असलेल्या व ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांसाठी शहरासाठी किमान दोन शासकीय डिसीएचसी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मध्यम प्रकृती असलेल्या व ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांसाठी शहरासाठी किमान दोन शासकीय डिसीएचसी हव्या, असे मत काही तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. सद्य स्थितीत केवळ इकरात ही व्यवस्था असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील भार वाढल्याचे सांगितले जात आहे.
इकरा वैद्यकीय महाविद्यालयात ७६ बेडचे डिसीएचसी अर्थात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहे. या ठिकाणी ऑक्सीजन बेडची सुविधा आहे. मात्र, शहराची लोकसंख्या व नियमीत आढळणारे रुग्ण या मानाने ही व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. सद्यस्थितीत रोज दोनशे ते तीनशे रुग्णांची भर पडत आहे. त्यात अनेकांना मध्यम स्वरूपाची लक्षणे असतात, त्यांना ऑक्सिजनची गरज भासते. अशा वेळी जागेची अडचण निर्माण होत असते. एकच डिसीएचसी असल्याने उर्वरित मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना जीएमसीत आणावे लागत असून त्यामुळे या ठिकाणी भार वाढत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या दृष्टीने प्रशासनाने आतातरी विचार करून महापालिका क्षेत्रात आणखी एक डिसीएचसी सुरू करावे, असा सूर उमटत आहे.
महिला रुग्णालय पर्याय मात्र..
मोहाडी येथे शंभर खाटांचे महिला रुग्णालय उभे राहत आहे. मात्र, याचे काम अद्यापही पाच ते दहा टक्के अपूर्ण आहे. कोरोनाचा शिरकाव होताच जर याबाबत नियोजन करण्यात आले असते तर या ठिकाणी मोठे डिसीएचसी उभे राहिले असते, आता रुग्णांची फरफट झाली नसती, मात्र, प्रशासनाने याकडे त्यादृष्टीने बघितलेच नाही आणि आता जागेची अडचण निर्माण झाली आहे.
सीएचओंच्या नियुक्तीचा पर्याय
जनसमुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपकेंद्रावर नियुक्त्या करण्यात आल्या असून यात अनेक जण हे बीएएमएस आहेत. काही मोजके तालुके सोडले तर कोरोनचा संसर्ग त्यामानाने अन्य तालुक्यांमध्ये कमी आहे. या सीएचओंची जीएमसीत नियुक्ती केल्यास मनुष्यबळाचा मुद्दा काही अंशी निकाली निघू शकतो, असाही एक तर्क समोर येत आहे.