अखेर जळगाव जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन रुग्णसेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:32 PM2017-10-27T12:32:36+5:302017-10-27T12:35:58+5:30
केवळ दाखल रुग्णांची होणार चाचणी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27 - जळगाव जिल्हा रुग्णलायात बसविण्यात आलेले नवीन सिटी स्कॅन मशिन अखेर रुग्णसेवेसाठी सज्ज झाले असून त्यावर सिटीस्कॅन करणे सुरू झाले आहे. सध्या केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांचेच सिटीस्कॅन केले जात असून बाह्यरुग्णांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या पूर्वी असलेले सिटी स्कॅन मशिन कालबाह्य झाल्याने गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन सेवा बंद होती. त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. त्यानंतर येथे नवीन सिटीस्कॅन मशिन मिळाले. मात्र वेगवेगळ्य़ा कारणांनी ते सुरू होण्यास अडथळे येत होते. अखेर 13 ऑक्टोबर रोजी या मशिनचा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. मात्र या मशिनची चाचणीच झाली नसल्याने ती प्रत्यक्ष रुग्णसेवेत येऊ शकली नाही. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन अखेर हे मशिन आता सुरू झाले असून यावर सिटीस्कॅनदेखील केले जात आहे.
अंतरुग्णांचीच तपासणी
सध्या हे मशिन नवीन असून त्यावर जास्त ताण येऊ नये व ते सुरळीत चालू रहावे यासाठी केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांचीच तपासणी केली जात आहे. यामध्येही केवळ डोक्याचेच सिटीस्कॅन होत असून हळूहळू ते पूर्णपणे सुरू होईल, असे सांगण्यात आले.
सिटीस्कॅन मशिन कार्यान्वित झाले असून सध्या केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांचे सिटीस्कॅन केले जात आहे.
- डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक.