फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:36+5:302021-01-10T04:12:36+5:30
जळगाव : विविध प्रकारच्या व्यावसायाची जाहिरात, विविध कंपन्यांच्या वस्तुंची, वाढदिवस, दुकानाचे उद्घाटन, प्रदर्शन, यश, निवड, यासह अगदी जन्म कुंडली ...
जळगाव : विविध प्रकारच्या व्यावसायाची जाहिरात, विविध कंपन्यांच्या वस्तुंची, वाढदिवस, दुकानाचे उद्घाटन, प्रदर्शन, यश, निवड, यासह अगदी जन्म कुंडली बनविण्यापासून तर घरगुती जेवणाच्या मेस उपलब्ध असण्याबाबत विविध ठिकाणी लावण्यात आलेले जाहिरातींचे फलक शहराच्या विद्रुपीकरणात हातभार लावत आहे. विशेष म्हणजे काही नागरिकांनी तर झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचा फलक लावल्यामुळे झाडांचेही नुकसान होत आहे. महापालिकेचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.
`लोकमत` प्रतिनिधीने शहरातील विविध भागातील रस्ते व चौकांची पाहणी केली असता, अनेक लहान-मोठे अनाधिकृत जाहिरातींचे होर्डींगज दिसून आले. विशेषत : नवीन बस स्थानक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, प्रभात चौक, बेंडाळे चौक, टॉवर चौक व नेहरु चौक या ठिकाणच्या प्रत्येक चौकमध्ये इमारती, झाडे, विद्युत खांब या ठिकाणी लहान व मोठे असे ८ ते १० फलक लावलेले दिसून आले. यातील काही फलक जुने होऊन फाटलेले आढळले. नेहरू चौकात विद्युत खांब्यावर लावलेला एका सिमेंट कंपनीचा फलक वाऱ्याने फाटून उलटा झालेला दिसून आला. तर स्टेडियम चौकात एका निंबाच्या झाडाला खिळा अडकवून, जाहिरातीचा फलक ठोकल्यामुळे झाडाचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे खिळा ठोकल्यामुळे या झाडाची अनेक ठिकाणी `सालटे` निघालेले दिसून आली.
इन्फो :
खाजगी होर्डिंगज मधुन सर्वाधिक कमाई :
महापालिकेतर्फे शहरात २५० खाजगी ठिकाणी जाहिरातीचे फलक लावण्याची परवानगी देण्यात येत असून, यातून वर्षाला मनपाला ३० लाखांचे उत्पन्न मिळत आहे. तर ज्या ठिकाणी सार्वजनिक जागा आहेत, अशा ठिकाणी मनपाकडून जाहिरातीचा फलक लावणाऱ्यांकडून १ रूपये चौरस मीटरप्रमाणे जाहिरातीच्या फलकाचे पैसे आकारले जातात. यातुन मनपाला वर्षा १० ते ११ लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.
इन्फो :
प्रशासनाच्या डुलक्या :
-शहरात मनपाची अधिकृत परवानगी घेऊनच, कुठल्याही जाहिरातीचे होर्डिंंग लावण्याची परवानगी आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी वाढदिवस, यश-निवडीचे अनाधिकृत होर्डिंग लागले असतांना, मनपाकडून यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.
- शहरात महावितरणचे विद्युत खांब आणि झाडांवर जाहिरातीचे होर्डिंग लावण्याला परवानगी नाही. असे असतांना अनेक रस्त्यांवरील झाडांवर व विद्युत खांबावर सर्रासपणे जाहिरातीचे होर्डिंग लागलेले आहेत. मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झालेली नाही.
-मनपाकडून अनाधिकृत होर्डिंग दिसल्यास जप्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, संबंधित होर्डिंग ज्या नागरिकाने लावले आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे, शहरात दिवसेंदिवस अनाधिकृत होर्डिंगची संख्या वाढून शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे.
इन्फो :
शहरात आम्ही परवानगी धारकानांच जाहिरातीचा फलक लावण्याची परवानगी आहे. अनाधिकृत जाहिरातीचा फलक दिसल्यावर जप्त करण्यात येतो. तसेच झाडे व विद्युत खांब्यावरही जाहिरातीचा फलक लावण्याला बंदी असून, त्यांच्यावरही कारवाई सुरूच असते.
नरेंद्र चौधरी, कर विभाग प्रमुख, मनपा.