शहराचा चेहरा-मोहरा धुळीने माखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:15 PM2020-01-13T12:15:45+5:302020-01-13T12:15:59+5:30

जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून शहराचा विकास होतोय का शहर भकास होत जात आहे ? असा प्रश्न जळगावकरांना पडला ...

 The city's face was covered with mist | शहराचा चेहरा-मोहरा धुळीने माखला

शहराचा चेहरा-मोहरा धुळीने माखला

Next

जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून शहराचा विकास होतोय का शहर भकास होत जात आहे ? असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे. वर्षभरात शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपले आश्वासन पाळत, शहराचा चेहरा-मोहरा धुळीने माखवून दाखविला आहे. मुख्य भागातील रस्ते असो वा उपनगरातील रस्ते सर्वदुर रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. रस्त्यांचा दुर्दशेमुळे सर्वच घरे धुळीने माखली आहेत. रस्त्यावर विक्री होणारी फळे भाज्या व पदार्थांवर देखील धूळ बसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर तर परिणाम होत आहे.
या प्रकारामुळे घरात व दुकानांमध्ये नेहमी धूळ साचत असल्याने दिवसभरात दहा वेळा साफसफाई करावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिल्या.
शहरातील रस्त्यांचे काम पूर्णपणे थांबले आहे. त्यातच मनपाकडून रस्त्यांची डागडूजी देखील केवळ नावालाच केली जाते. त्यामुळे काही दिवसातच त्या दुरुस्तीचे पितळ उघडे पडते. अमृत योजना, मलनिस्सारण योजनेमुळे शहरात खड्डे निर्माण ही परिस्थिती सत्य असली तरी ज्या ठिकाणी अमृतचे काम झालेली नाही अशाही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच दुभाजकांच्या कामांमुळे देखील रस्त्यांची वाट लागली आहे.
अनुभवली भयंकर परिस्थिती
‘लोकमत’ ने शहरातील काही भागात जावून पाहणी केली यामध्ये इच्छा देवी चौक ते डिमार्टचा रस्ता, गणेश कॉलनी चौक ते कोर्ट चौक, दुध फेडरेशन ते बजरंग बोगदा, काव्यरत्नावती चौक ते रामानंदनगर स्टॉप, गुजराल पेट्रोल पंप ते निमखेडी, स्टेडीयम ते स्वातंत्र्य चौक या प्रमुख रस्त्यांसह दादावाडी, शिवाजीनगर, प्रेम नगर, अयोध्या नगर या उपनगरांमध्येही जावून पाहणी केली. या सर्व रस्त्यांवर प्रचंड धुळ पहायला मिळाली. या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते त्यामुळे अनेक नागरिकांनी घरांवर ग्रीन नेट लावलेले दिसून आले.
पदार्थ, फळांवरही धुळच्-धुळ
फळं, पदार्थ व भाजीपाल्यावर देखील प्रचंड धुळ बसते. त्यामुळे फळ विक्रेतेही त्रस्त झाले आहेत.

वातावरणात धुलीकणांचे वाढले प्रमाण
गेल्या दोन वर्षात शहरातील हवेच्या अहवालात वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. महाराष्टÑ प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांच्या प्रमाणात धुलीकणांचे प्रमाण कमी झाले असले तरी सरासरीपेक्षा हे प्रमाण अधिकच असून, धुलीकणांमुळे श्वसनाच्या विकारात वाढ होण्याची शक्यता आहे. श्वसनाद्वारे शरीरात जाणारे धुलीकण आरएसपीएम (रिस्पेरेबल सस्पेडंट पर्टिकुलर मॅटर) व श्वसनाद्वारे शरीरात न जाणारे धुलीकण आरएसपी( सस्पेडंट पर्टिकुलर मॅटर), दोन्ही धुलीकणांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला केवळ शहरातील नादुरुस्त रस्तेच जबाबदार असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. जळगावच्या हवेत सरासरी ६० टक्के धुलीकणांचे प्रमाण असते. मात्र, दोन वर्षात हे प्रमाण ७२ टक््क्यांवर पोहचले आहे.

‘तो’ दावा ठरला फोल ; आलेला निधी ही थांबला ; पुढे निधी मिळण्याचीही शक्यताही धुसर
सत्ताधारी भाजपने मनपा निवडणुकीत शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याची भाषा केली होती. त्यानुसार सत्ताधाºयांचा दावा पुर्णपणे फोल ठरला आहे. शहराची हालत ‘बदसे बत्तर’ होत जात असून, दीड वर्षांपुर्वी शासनाकडून मिळालेल्या १०० कोटी रुपयांचे नियोजन ही सत्ताधाºयांना न करता आल्याने कामांना सुरु वात होवू शकली नाही. त्यातच राज्यात नवीन सरकार आल्यानंतर या निधीला देखील स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे या निधीवरील स्थगिती केव्हा उठेल आणि रस्त्यांचे भाग्य केव्हा उजडेल याची प्रतीक्षा जळगावकरांना लागली आहे.

घरे दिवसभर ठेवावी लागतात बंद
धुळीपासून बचावासाठी घरे दिवसभर बंद ठेवतात. काहींनी घरांवर ग्रीन नेट लावले आहे. तरीही धुळीचे कण घरात जातात. त्यामुळे गृहीणींना दिवसभरात १० ते १५ वेळा झाडू मारून घर पुसावे लागत आहे. घरासमोर लावण्यात आलेल्या गाड्या देखील धुळीने माखलेल्या पहायला मिळतात. या रस्त्यांवर येणाºया दुकाने, कार्यालय असो वा दवाखाने या ठिकाणी देखील हिच परिस्थिती निर्माण झालेली पहायला मिळाली.

दिवसभर रस्यावर धुळ उडत असते. त्यामुळे दिवसाही घराचे दोन्ही दरवाजे बंदच ठेवावे लागतात. तरीही घरात धुळ येतेच, कपांउड मध्ये तर धुळीचा थर लागत असतो. त्यामुळे संपुर्ण दिवस घरात झाडू मारण्यात घर पुसण्यातच जातो.
-लिना दुबे,
गृहिणी, शांती नगर,

भाज्यांना कितीही झाकून ठेवले तरीही सर्व भाज्या या धुळीने माखतात, त्यामुळे ग्राहकांना त्या भाज्या विक्री करणेही कठीण होते.
- रंजना सोनवणे, भाजीपाला विक्रेत्या, ख्वॉजामिया दर्ग्याजवळ

रस्त्यांलगतच माझे दुकान आहे. मात्र, काही वर्षांपासून रस्त्यांची स्थिती खराब झाल्यामुळे दिवसभर धुळ उडत असते. सर्व धुळ ही दुकानात जाते. घर असेल तर ते बंद करता येवू शकते. मात्र, माझे दुकान हे बंद करता येत नाही. त्यामुळे दिवसभर ग्राहक ही पहावे लागतात व धुळ देखील साफ करावी लागते.
-अमोल कोठावदे, फर्नींचर दुकानदार,
गणेश कॉलनी

Web Title:  The city's face was covered with mist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.