शहर स्वच्छतेचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:12+5:302020-12-08T04:13:12+5:30
जळगाव : स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी नसल्याचा दावा भाजपने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये ...
जळगाव : स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी नसल्याचा दावा भाजपने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग व गटारी तुंबलेल्या आढळून आल्याने सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे. या कचऱ्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत असत.
शहरातील विविध भागातील नागरिकांकडून अनियमित साफसफाईच्या तक्रारी येत असतानाही, भाजपकडून मात्र शहरातील सर्व भागातील कचरा ४८ तासांत उचलला जात असल्याचा दावा केला आहे. या दाव्याच्या अनुषंगाने ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी शहरातील काही भागांची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी कचराकुंड्या भरून वाहताना दिसून आल्या. तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून आले. या ठिकाणी नियमित घंटागाडी येत नसून, सफाईसाठी मजूरही नियमित येत नाहीत. त्यामुळे कचरा तीन ते चार दिवस जागेवरच पडून राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडेही अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, तरीदेखील नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे आता तक्रारी करणेच बंद केले असल्याचेही रहिवाशांनी सांगितले. विशेष म्हणजे काही रहिवाशांनी तर नियमित स्वछता होत नसल्यामुळे अस्वच्छतेत राहण्याची सवय झाली असल्याचे सांगितले.