शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:47 PM2020-07-28T12:47:56+5:302020-07-28T12:48:04+5:30
जळगाव : जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसाने सरासरीची पन्नासी गाठली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. वाघूर ...
जळगाव : जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसाने सरासरीची पन्नासी गाठली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. वाघूर धरणात ८२ टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे जळगाव व जामनेर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न यंदाही मिटणार आहे.
जिल्ह्यातील मंगरूळ, अग्नावती, सुकी, हिवरा या चार प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा झाला आहे. ही चारही धरणे ओसंडून वाहत आहेत. यासह बोरी, गुळ, तोंडापूर या प्रकल्पांमध्येही जलसाठा शंभरीकडे वाटचाल करत आहे. यामुळे अनेक तालुक्यांमध्ये ही यंदा सुजलाम-सुफलाम स्थिती पहायला मिळणार आहे.
५२ टक्के पाऊस
जिल्ह्यात यंदा २६ जुलैपर्यंत ५२ टक्के पाऊस झाला आहे. अनेक वर्षांच्या तुलनेत जुलैपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी जास्त असली तरी जिल्ह्यात यंदा झालेला पाऊस सलग नसून, तुटक स्वरुपाचा आहे. तसेच एका तालुक्यात पाऊस झाल्यास दुसऱ्या तालुक्यात हा पाऊस होत नाही असेच चित्र सध्या दिसून येत आहे. हवामान बदलामुळे मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातला हा एक परिणाम म्हणावा लागेल असे जाणकारांचे मत आहे.
गिरणा फुल्ल झाल्यास मिळणार पाच आवर्तने ?
-गिरणा धरणाच्या जलसाठ्यात देखील वाढ झााली असून, गिरणा धरणात ४२ टक्के जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यातच ही स्थिती झाल्यामुळे चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव व जळगाव तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांनाही यामुळे फायदा होणार आहे. तसेच सप्टेंबरअखेरपर्यंत गिरणा धरणाचा जलसाठा ८० पारही गेला तरी गिरणेतून चार ते पाच आवर्तने मे महिन्यापर्यंत मिळतात. त्यामुळे गेल्या वर्षांप्रमाणे गिरणा काठच्या गावांचाही पिण्याचा पाण्यासह शेतीसाठीचा प्रश्न मिटणार आहे.