भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास नागरिकाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:21 PM2019-08-30T12:21:56+5:302019-08-30T12:22:04+5:30
आरोपीला अटक होईपर्यंत काम बंद
जळगाव : उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक प्रफुल्ल पाटील यांना राजा भगवान सोनवणे या व्यक्तीने बुधवार, २८ रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कार्यालयातच काहीही कारण नसताना शिविगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसांत दिली आहे. दरम्यान आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नगरभूमापन, तालुका भूमिअभिलेख व जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाºयांनी गुरूवारी कामबंद आंदोलन केले. अपर जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा जिल्हा भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे.
गुरूवार २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात राष्टÑीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत मिळकत पत्रिकांचे डाटा रिस्ट्रक्चरिंगचे काम व कार्यालयीन कामकाजात कर्मचारी व्यस्त असताना राजा सोनवणे हे तेथे आले. त्यांनी भू-करमापक कृष्णा भट यांना एकेरी भाषेत इतका वेळ कार्यालयात का थांबतो? असे सांगत वाद घातला. त्यावेळी भू-मापक प्रफुल्ल पाटील हे भट यांच्याशी कामाबद्दल काही बोलत असताना सोनवणे याने प्रफुल्ल पाटील यांना अश्लील शिविगाळ करून चापटा व बुक्क्याने मारहाण केली. तसेच खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत निघून गेला.
निवेदनात व फिर्यादीत म्हटले आहे की, सोनवणे याने यापूर्वीही तत्कालीन तहसीलदार कैलास देवरे यांच्याशी हुज्जत घातली होती. तहसील व पुरवठा विभागातील कर्मचाºयांश्ी वाद घालून नेहमीच शिविगाळ करतो. हप्ता वसुलीसाठी हा उद्योग असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे.
त्रास नेहमीचाच
याबाबत अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील भूमि अभिलेख कार्यालयात जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख धोंगडे, नगर भूमापन अधिकारी कार्यालय प्रमुख राजेंद्र कपोते, अतिरिक्त प्र.उपअधीक्षक भूमि अभिलेख यांच्याशी राजा सोनवणे हे कोणतेही कार्यालयीन काम प्रलंबित नसताना नेहमीच कार्यालयात येऊन हुज्जत घालून भ्रष्टाचाराचे आरोप करतात. तुम्ही पैसे खाऊन काम करतात. तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, असे सांगत धमकावतात. तसेच कारण नसताना कार्यालयात येऊन कर्मचाºयांच्या खुर्चीवर बसून काहीही वाईट भाषेत बोलतात. महिला कर्मचारी यांनाही लज्जास्पद शब्द वापरतात. अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देत असतात.
सायंकाळपर्यंत अटक नाहीच
या घटनेनंतर गुरूवारी भूमि अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचाºयांनी व अधिकाºयांसह जाऊन अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांना तसेच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना निवेदन देत आरोपीला अटक होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा दिला. मात्र सायंकाळपर्यंतही आरोपीस अटक झालेली नव्हती. त्यामुळे अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याची भूमिका जिल्हा भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेकडून जाहीर करण्यात आली आहे.