जळगावात त्रिसदस्यीय समितीकडून ‘सिव्हिल’ची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 07:35 PM2018-06-19T19:35:19+5:302018-06-19T19:35:19+5:30
विद्यापीठाशी संलग्नीकरण गरजेचे
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नीकरणासाठी मंगळवारी त्रिसदस्यीय पथकाने जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.
जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यापीठाशी संलग्नीकरण असणे गरजेचे आहे. त्यासाठी जळगावातील या वैद्यकीय महाविद्यालयाचे नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. गिरीश ठाकूर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर), एससीएसएमसीचे प्राचार्य डॉ. पराग भागवत या तीन सदस्यांनी मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग, अपघात कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, दाखल रुण, व्याख्याता कक्ष, अभ्याक्रमसाठी आवश्यक वर्गखोल्या, सुविधा, प्रात्यक्षिक कक्ष अशा विविध विभागांची पाहणी केली.
या वेळी अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, डॉ. चंद्रकांत डांगे, डॉ. अरुण जीरवनकर, डॉ. श्यामराव वाकोडे, डॉ. हेमंत चौधरी आदी उपस्थित होते.
पाहणीनंतर समितीतील सदस्यांनी अधिष्ठातांच्या दालनात बैठक घेतली. त्यामध्ये आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
पाहणीनंतर अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी सांगितले की, समितीने समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षी अभ्यासक्रम संलग्नीकरणासाठी समितीकडून ही पाहणी केली जाते.