कोट्यवधीच्या निधीचा दावा, मात्र विकास झाला तरी कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:02 PM2019-07-22T13:02:14+5:302019-07-22T13:03:19+5:30
रोटरीतर्फे चर्चासत्र : त्रासाला कोण जबाबदार ? : प्रश्न अनुत्तरीतच
जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यवधीचा निधी आल्याचा दावा लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. मात्र, या कोट्यवधीच्या निधीतून विकास झाला तरी कुठे ? असा प्रश्न रविवारी रोटरी वेस्टतर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित ‘जळगावकरांच्या त्रासाला कोण जबाबदार ?’ या विषयावरील चर्चासत्रात उपस्थित नागरिकांनी केला. मात्र, त्रासापासून मुक्तता होईल, असे उत्तर मिळू शकले नाही.
शहरातील रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत आहे. संपूर्ण शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जळगावकरांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार आहे तरी कोण ? याबाबत नागरिकांना उत्तर मिळावे यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर सुशिलकुमार राणे, किशोर ढाके, गनी मेमन, अॅड.सुरज जहांगीर, सुनील सुखाणी आदी उपस्थित होते.
२८ कोटी आले सुविधांचा पत्ताच नाही
उद्योजक किशोर ढाके म्हणाले की, २५ वर्षानंतर पहिल्यादांच एमआयडीसीच्या विकासाठी २८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र, त्यातून कोणत्या समस्या सोडविण्यात आला ? हे न कळण्यापलीकडे असल्याचे सांगितले. शहरातील मुख्य चौकात सिग्नल व्यवस्था आहे. मात्र, ती अनेकदा बंद असते ती व्यवस्था जर सुरु राहिली असती तर अनिल बोरोले यांचा मृत्यू कदाचित झाला नसता. अमृत योजनेमुळे रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला असून त्याची दुरुस्ती होत नसल्याचे ढाके यांनी सांगितले.
३५० कोटी वसुल करून दाखवतो
गाळ्यांबाबत दीपककुमार गुप्ता यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर आयुक्तांनी हा प्रश्न टाळल्यानंतर गुप्ता यांनी १५ दिवस आयुक्त बनवा आपण गाळेधारकांकडून ३५० कोटींची वसुली करून दाखवतो असा प्रस्ताव दिला. त्यावर हा चित्रपटाचा विषय नसून तसा नियम नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर अॅड.राहुल लाठी यांनी समस्या सोडवू शकत नसेल तर मनपा बरखास्त करुन टाकावी असे सांगितले.
आयुक्तांनी सांगितल्या मनपाच्या कमजोर व मजबूत बाजु ; गाळ्यांबाबत भाष्य नाही
- आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी मनपाच्या कमजोर बाजू व मजबूत बाजू यावेळी मांडल्या., सध्या मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असून मनपात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.
- महिने-दोन महिन्यात शहराच्या समस्या सोडवायच्या असतील तर माझ्याकडे जादुचा दिवा द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील काही वर्षात शहरात पाणी पुरवठा, मलनिस्सारण योजनेसह पिंप्राळा व शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम झाल्यामुळे मोठ्या अडचणी दुर होणार असल्याचे सांगितले.
- सफाईचा ठेका देण्यात आला असून, आॅगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यात मक्तेदाराकडून काम सुरु झाल्यानंतर कचºयाची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. तर एमआयडीसी च्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, गाळ्यांचा प्रश्नांबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे सांगत आयुक्तांनी गाळ्याचा प्रश्नाला बगल दिल्याचेच दिसून आले.