खंडणीसाठी पाल निघाल्याचे नाट्य घडविल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:58+5:302021-06-20T04:12:58+5:30
व्यावसायिकाची पोलिसांकडे तक्रार : कोर्टातही जाणार जळगाव : दोन लाख रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून समोस्यात पाल निघाल्याचा बनाव ...
व्यावसायिकाची पोलिसांकडे तक्रार : कोर्टातही जाणार
जळगाव : दोन लाख रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून समोस्यात पाल निघाल्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा गोकुळ स्वीटचे संचालक सखाराम गजमनाराव चौधरी (रा.रिंग रोड) यांनी केला असून शंभू दिलीप भोसले व त्याच्यासोबत असलेल्या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा यासाठी त्यांनी शनिवारी अपर पोलीस अधीक्षक व जिल्हा पेठ पोलिसांकडे तक्रार केली.
ख्वॉजामिया चौकातील गोकुल स्वीट या दुकानातून घेतलेल्या समोस्यात पाल निघाली व ती खाल्ल्यामुळे आपल्याला त्रास झाल्याचा दावा करुन शंभू भोसले त्याच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी गोंधळ घातला होता. प्रसारमाध्यमांना समोसा व पालचा फोटोही दाखविण्यात आला होता. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात असा प्रकार घडलेलाच नाही. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. ८ जून रोजी शंभू हा एक महिला व लहान मुलीसोबत आला होता. तेव्हा त्याला कुपन घ्यायला लावल्याचे सांगितले असता त्याने गोंधळ घातला होता. त्याचवेळी त्याने दुकान सील करण्याची धमकी दिली होती व ती वेळ त्याने १८ जून रोजी निवडली. दोन मित्रांसोबत तो दुपारी १ वाजता नियोजनबध्द दुकानावर आला. निळ्या व गुलाबी शर्ट घातलेल्या व्यक्तींनी पालीचा तुकडा समोस्यावर ठेवून गुलाबी शर्ट असलेल्या व्यक्तीने उलटी होण्याच्या उद्देशाने तोंडात बोटे घातली व पाल खाल्ल्याचा बनाव केला, असे चौधरी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. खंडणीसाठीच त्यांनी हा प्रकार केल्याने त्यांच्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन त्यांनी दिले आहे. या प्रकरणात आपण न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
--