"भूमिका स्पष्ट करा आणि नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्या"
By सुनील पाटील | Published: January 10, 2024 03:17 PM2024-01-10T15:17:00+5:302024-01-10T15:17:16+5:30
...अन्यथा गंच्छती : दिलीप वाघ यांना अजित पवार गटाचा इशारा.
जळगाव : आपण नेमके कोणत्या गटात आहात, याबाबत तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, आणि नैतिकतेच्या आधारावर जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आपण शरद पवार गटात असल्याचे गृहीत धरुन जिल्हा नियोजन मंडळातून गच्छंती करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी माजी आमदार दिलीप वाघ यांना दिला आहे.
दिलीप वाघ यांची मंत्री अनिल पाटील यांच्या शिफारशीने अजित पवार गटाकडून जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.गेल्या आठवड्यात दिलीप वाघ शिर्डी येथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शिबिरात व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या शेजारीच हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी शरद पवार यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांनी हे प्रत्यक्ष बैठकीत उपस्थित होते तर दिलीप वाघ घेतलेल्या झूमद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार गटात संताप व संभ्रम निर्माण झालेला आहे. याच मुद्यावर ‘लोकमत’ने वाघ यांना दोन वेळा विचारणा केली असता, आपण जळगावला येऊन बोलू इतकेच ते म्हणाले होते.
आग्रहामुळे संधी दिली
दिलीप वाघ स्वत: माजी आमदार व त्यांना राजकीय वारसा आहे. ते मोठे नेते आहेत, तरी देखील त्यांनी नियोजन मंडळावर घ्यावे म्हणून इच्छा व्यक्त केली. खरे तर त्यांनी हे पद घ्यायला नको होते, तेथे एखाद्या उमद्या कार्यकर्त्याला संधी देता आली असती. आमचा पक्ष कोणाच्या ताटाखालचे मांजर नाही, असेही संजय पवार यांनी ठणकावले आहे. अनेक नेत्यांना कुटूंबातच पदे लागतात. काही जण व्यक्ती केंद्रीत असून पक्षाशी एकनिष्ट नाहीत असाही टोला त्यांनी कोणाचे नाव न घेता लगावला.
दिलीप वाघ यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. दोन्ही हातात प्रसाद घेतल्यामुळे त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व संताप व्यक्त होत आहे. वाघ यानी स्वत:हून तातडीने भूमिका जाहिर करावी. अन्यथा हकालपट्टीचे पत्र काढावे लागेल.
-संजय पवार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष, अजित पवार गट