पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात तरूणांमध्ये झोंबाझोंबी...
By सागर दुबे | Published: March 16, 2023 03:28 PM2023-03-16T15:28:52+5:302023-03-16T15:29:08+5:30
क्षुल्लक कारणावरून वाद ; आठ जणांविरूध्द गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रामानंदनगर पोलिसांनी दोन संशयितांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा येथे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आणले होते. त्यामुळे महिला सहाय्यक कक्षाजवळ उभ्या असलेल्या संशयितांच्या मित्र मंडळींमध्ये अचानक क्षुल्लक कारणावरून वाद उफाळून झोंबाझोंबी झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री आठ जणांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रामानंदनगर पोलिस ठाण्यातील अंमलदार विजय जाधव यांनी बुधवारी सायंकाळी सागर उर्फ महेश विलास पाटील (रा. पिंप्राळा) व विशाल प्रफुल्ल थोरात यांना प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखा येथे आणले होते. या दोघांची मित्र मंडळी ही महिला सहाय्यक कक्षाजवळ उभी होती. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्यामध्ये आपआपसात क्षुल्लक कारणावरून वाद होवून झोंबाझोंबी सुरू झाली आणि मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करू लागले. हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेतील जितेंद्र पाटील, संजय पाटील, महेश महाजन, ईश्वर पाटील यांना दिसल्यानंतर त्यांनी तरूणांच्या दिशेने धाव घेवून त्यांच्यातील वाद सोडवून चौकशी केली.
त्यावेळी त्यांनी गौरव समाधान सोनवणे (२१, रा. गुजराल पेट्रोल पंपाजवळ), प्रसाद कमलाकर पाटील (१८, रा. निवृत्तीनगर), मोहित संदीप पाटील (१८, रा. संत मिराबाई नगर), प्रथमेश सुरेश साळूंखे (१९, ओमशांती नगर), खुशाल गोकूळ पाटील (१८, रा. औझानगर), निरज जितेंद्र सूर्यवंशी (१८, रा.आर.एल.कॉलनी), निर्भय शितल शिरसाठ (१८, रा. प्रबुध्दनगर, पिंप्राळा), तेजस सुहास गोसावी (१८, रा. दादावाडी) असे त्यांची नावे सांगितली. त्यानंतर जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात झोंबाझोंबी करणा-या आठही जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.