जनता एक्सप्रेसमधील गार्ड व सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारी; खंडवा-भुसावळ स्टेशन दरम्यान प्रकार
By सचिन देव | Published: July 9, 2023 07:45 PM2023-07-09T19:45:27+5:302023-07-09T19:45:45+5:30
जीआरपी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीत तपासणीत गाडीतील सुरक्षा रक्षक संदीप कुमार याला बेदम मारहाण केल्याचे तपासणीतुन समोर आले आहे.
जळगाव: बिहारहुन मुंबईकडे जाणाऱ्या अपच्या जनता एक्सप्रेसमध्ये (गाडी क्रमांक १३२०१) शनिवारी मध्यरात्री गार्ड व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडी उशिरा धावण्याच्या चौकशीवरुन ही हाणामारीची घटना घडली असून, या घटनेनंतर भुसावळ स्टेशनवर गाडीतील रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी मध्यरात्री रेल्वेच्या गार्ड कर्मचाऱ्यांनी चांगलाच गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केेले. यामुळे जनता एक्सप्रेसचा तासभर खोळंबा झाला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारकडुन येणारी पटना एक्सप्रेस रात्री बारा वाजता खंडवा स्टेशनवर आल्यानंतर, या गाडीला खंडव्याहुन भुसावळ पर्यंत एस्कॉर्ट सुरक्षा देण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजीव कुमार, दीपेंद्र सोलंकी व संदीप कुमार यांच्यावर देण्यात आली होती. खंडव्याला ही गाडी येण्याची वेळ रात्री सव्वा अकराची असतांना, गाडी बारा वाजता आल्यामुळे, ही गाडी उशिरा का धावली, वाटेत काही समस्या निर्माण झाली होती का, याची चौकशी करण्यासाठी हे सुरक्षा रक्षक पोलीस गार्डच्या डब्यात गेले. गार्डच्या डब्यात गेल्यानंतर या एक्सप्रेसचे गार्ड रजनीकांत डे व त्यांच्या सोबत असलेले राजेश मीना यांनी या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोठ-मोठ्याने आवाज करून वाद घातला. यावेळी सुरक्षा रक्षक संदीप कुमार व एका गार्डमध्ये जोरदार हाणामारीही झाली. खंडवा येथुन बऱ्हानपुर स्टेशनवर गाडी आल्यानंतरही या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन, अर्धा तास गाडीचा खोळंबा झाला.
अन् गार्ड कर्मचाऱ्यांचे मध्यरात्री स्टेशनवर ठिय्या आंदोलन..
जनता एक्सप्रेसमध्ये गार्ड व रेल्वे पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलीस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर, दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता. तसेच यावेळी स्टेशनवर डियुटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते. भुसावळ स्टेशनवर मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जोरदार वाद झाला. यावेळी गार्ड कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी गदारोळ करित ठिय्या आंदोलन केले. यानंतर जीआरपी पोलिसांनी रेल्वे पोलिसांसह गाडीतील दोन्ही गार्ड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन, जनता एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने मार्गस्थ केली.
रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण..
जीआरपी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीत तपासणीत गाडीतील सुरक्षा रक्षक संदीप कुमार याला बेदम मारहाण केल्याचे तपासणीतुन समोर आले आहे. दोघांच्या तक्रारीवरून जीआरपी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत.
जनता एक्सप्रेसमध्ये गार्ड व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेली वादाची घटना खरी आहे. मात्र, हा प्रकार खंडवा स्टेशन हद्दीत घडला असल्याने, त्यांच्याकडे तक्रार वर्ग केली आहे. विजय घेरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस, भुसावळ