नागाशी भिडली! बाळाला नागाचा विळखा, ती आई होती म्हणूनी... डसला पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 09:42 AM2023-06-10T09:42:23+5:302023-06-10T09:42:41+5:30
बाळासाठी आईचे काळाशी दोन हात.... तान्हुले बाळ, रात्रीच्या अंधारात झोपले होते... तिचे डोळे उघडले पाहते तर काय... ग्रामस्थांनी शंकरालाच पाण्यात ठेवले...
भास्कर पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
महिंदळे (जि. जळगाव) : रात्रीची वेळ. घरात आई आणि तिचे तान्हे बाळ झोपलेले. रात्री अचानक बाळ रडायला लागले. आईला जाग आली. पाहते तर बाळाच्या अंगावर चक्क नाग. क्षणाचाही विलंब न करता आईने या नागाला पकडून दूर फेकले आणि एवढ्यातच नागाने तिला हाताला दंश केला. गेल्या पाच दिवसांपासून आईची मृत्यूशी झुंज सुरू होती. गुरुवारी त्या झुंजार आईने या लढाईवर मात केली.
एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना महिंदळे, ता. भडगाव येथे गेल्या आठवड्यात घडली. महिंदळे येथील भिकन नरसिंग राजपूत यांची कन्या ज्योती हिचे सासर बांभोरी, ता. एरंडोल येथील. काही दिवसांपूर्वी ती बाळंतपणासाठी माहेरी आलेली. तिला पुत्ररत्न झाले. गेल्या आठवड्यात पहाटे आई व बाळ झोपेत होते त्यावेळी ही घटना घडली. बाळासाठी जिवाची बाजी लावणारी ज्योतीमधली हिरकणी जागी झाली आणि क्षणात तिने नागाला हातात पकडून दूर फेकले. यात तिला नागाने दंश केला. काही कळण्याच्या आतच ती अस्वस्थ झाली. ज्योती हिला वेळीच सर्पदंश विरोधी लसीची इंजेक्शन देण्यात आली. त्यामुळे ती वाचल्याची माहिती डॉ. सागर गरुड यांनी दिली.
लढाई जिंकली
तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने तिला पाचोरा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉ. भूषण मगर यांनी वेळीच औषधोपचार केले. पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर ज्योतीने ही लढाई जिंकली. डॉक्टरांनी सांगितले.
ज्योती लवकर बरी व्हावी, यासाठी गावातील महिलांनी तिची प्रकृती आता महादेवाला साकडे घातले होते. मंदिराचा गाभारा पाण्याने भरला होता.