धावत्या रेल्वेखाली आल्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; अपघात की आत्महत्या...
By सागर दुबे | Published: February 28, 2023 08:08 PM2023-02-28T20:08:19+5:302023-02-28T20:08:25+5:30
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश
जळगाव :जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली आल्याने हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या रोहित लक्ष्मण मोरे (१६, रा. तडवी वाडा, हरीविठ्ठल नगर) या दहावीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हरिविठ्ठल नगर येथील तडवीवाडा येथे रोहित हा आई किरणबाई व वडील लक्ष्मण मोरे यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो रामानंद नगरातील बहिणाबाई चौधरी माध्यमिक विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी ४ वाजता रोहित हा घरात कुणाला काहीही न सांगता घराबाहेर निघाला. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रेल्वेलाइन दरम्यानच्या रेल्वे खांबा क्रमांक ४१५/१६ए-१बीएजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांसह कुटुंबीयांची घटनास्थळी धाव...
जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वे रुळावर एका युवकाची रेल्वेखाली मृत्यू झाल्याची माहिती लोकोपायलटने दिल्यानंतर काही मिनिटात घटनास्थळी रामानंदनगर पोलिस दाखल झाले होते. मृतदेहाची अंगझडती घेतल्यावर खिश्यातील कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह रात्री जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. एकुलता एक मुलगा गेल्याने आई व वडिलांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. मंगळवारी सकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास विकास महाजन करीत आहेत.