माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा पुण्यात वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:21+5:302021-01-08T04:49:21+5:30
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या वादप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, तानाजी भोईटे, ...
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या वादप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, तानाजी भोईटे, सुनील झंवर, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह २९ जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा सोमवारी रात्री कोथरूड पोलिसांत वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, ही फिर्याद रद्द करण्यासाठी गिरीश महाजन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर ७ जानेवारी रोजी कामकाज होणार आहे.
ॲड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा, ता. रावेर पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरुद्ध ९ डिसेंबर रोजी फिर्याद दिली होती. घटनास्थळ पुणे असल्याने हा गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला होता. २५ दिवसांनंतर सोमवारी हा गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग झाला. दरम्यान, गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांनी फिर्याद रद्द करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्या.एस.एस. शिंदे व न्या.एम.एस. कर्णिक यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीला आले आहे. ७ जानेवारी रोजी यावर आता कामकाज होणार आहे.
विरोधी पक्ष नेत्यांचा दबाव असण्याची शक्यता
निंभोरा येथून ९ डिसेंबर रोजी फिर्याद शून्य क्रमांकाने पुण्यात वर्ग झाली. खरे तर त्याच दिवशी तेथे गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. इतके दिवस गुन्हा नोंदविण्यास विलंब करण्यामागे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा दबाव असू शकतो, असा आरोप ॲड. विजय पाटील यांनी मंगळवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना केला आहे. महाजन हे फडणवीसांचे जवळचे आहेत व त्यांचे सरकार असताना गृहखाते फडणवीसांकडेच होते, त्यामुळे पोलीस त्यांचे तेव्हाही ऐकत होते व आताही ऐकत असतील, असे ॲड.पाटील म्हणाले.