महापालिकेच्या रिक्त २ हजार जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 11:30 AM2022-06-18T11:30:39+5:302022-06-18T11:31:22+5:30
गुरुवारी सायंकाळी मनपातील आकृतीबंधाच्या विषयावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयातील अधिकारी, अस्थापना विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या आकृतीबंधाबाबत चर्चा झाली.
जळगाव : महापालिकेतील ३२०० कर्मचाऱ्यांची संख्या आता १ हजारपर्यंत खाली आली असून, गेल्या अनेक वर्षांमध्ये महापालिकेतील २२०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिकेतील रिक्त जागांमुळे मनपा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. अनेक वर्षांपासून महापालिकेतील रिक्त जागा भरण्याबाबत आकृतीबंधाचा शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला आता शासनाकडून लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेतील रिक्त असलेल्या २१३७ जागा भरण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे.
महापौर जयश्री महाजन यांच्यासह उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. गुरुवारी सायंकाळी मनपातील आकृतीबंधाच्या विषयावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयातील अधिकारी, अस्थापना विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या आकृतीबंधाबाबत चर्चा झाली.
नगरविकास मंत्रालयाकडून मनपा प्रशासनाने पाठविलेल्या आकृतीबंधाच्या प्रस्तावात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करून, सोमवारी नवीन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना नगरविकास मंत्रालयाकडून महापालिकेला देण्यात आल्याचीही माहिती महापौरांनी दिली. सोमवारी हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, प्रस्ताव पाठविल्यानंतर आठवडाभराच्या आता आकृतीबंधाचा विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन नगरविकास मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे मनपात लवकरच २ हजार जागांची ‘जम्बो भरती’ होण्याची शक्यता आहे.
९६ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचाही मार्ग मोकळा
महापालिकेतील ९६ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. त्यात या कर्मचाऱ्यांची शिक्षणाची अट शिथील करून, त्यांना महापालिकेच्या सेवेत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महापालिकेतील अनुकंपाधारकांच्या विषयावर नगरविकास मंत्रालयाने महापालिकेवरच निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनुकंपाधारकांचा विषय हा स्थानिक पातळीवर घेण्याचा विषय असून, मंत्रालयापर्यंत आणण्याचा हा विषय नसल्याचेही नगरविकास मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आकृतीबंध, अनुकंपाधारकांचा विषय व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असलेला आकृतीबंधाचा विषय आता मार्गी लागणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: या विषयात लक्ष घालून, गुरुवारी बैठक घेतली. तसेच मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. आकृतीबंधासह, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणे व अनुकंपाधारकांच्या दृष्टीने देखील निर्णय होणार आहे.
- जयश्री महाजन, महापौर