एकनाथ खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनावर पुन्हा अनिश्चिततेचे ढग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:59+5:302021-07-08T04:12:59+5:30
ईडीच्या कारवाईनंतर वाढली अडचण : राष्ट्रवादी प्रवेशाच्या साडेआठ महिन्यांनंतरही कोणतेही पद नाही, त्यात आता कारवाईची टांगती तलवार जळगाव : ...
ईडीच्या कारवाईनंतर वाढली अडचण : राष्ट्रवादी प्रवेशाच्या साडेआठ महिन्यांनंतरही कोणतेही पद नाही, त्यात आता कारवाईची टांगती तलवार
जळगाव : ‘उमेदवारीबाबत आपला अनुभव चांगला नाही’, असे भाजपमध्ये असताना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चेवर मत व्यक्त करणारे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून साडेआठ महिने उलटले तरी त्यांना कोणतेही पद मिळालेले नाही. त्यात आता विधान परिषदेच्या हालचाली सुरू असताना ईडीच्या कारवाईने पुन्हा त्यांच्या संभाव्य उमेदवारीवर अनिश्चिततेचे सावट आले आहे. खडसे यांच्या जावयाला अटक झाल्याने पुढील कारवाई काय होते, याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसही सावध भूमिका घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर चौकशीचा ससेमिरा
गेल्या ४० ते ४२ वर्षांपासून एकनाथ खडसे हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप खान्देशात वाढला. इतकेच नव्हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची सूत्रे खान्देशपुरती एकनाथ खडसे यांच्याकडे होती. त्यांनीच उमेदवारीचे निर्णय घेतले. मात्र, या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात ते असताना आरोप व चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला. यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम यांच्या पत्नीसोबत खडसे यांचे संभाषण झाल्याचा आरोप हॅकर मनीष भंगाळे याने केला आणि राज्यातच नव्हे, तर देशभरात खळबळ उडवून दिली. हा आरोप होत नाही तोच भोसरी (पुणे) येथील भूखंड प्रकरणाची चौकशी मागे लागली. या सर्व प्रकारामुळे खडसे यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
वारंवार उघडपणे नाराजी व्यक्त
मंत्रीपद गेले तरी पक्ष आपला विचार करील या भावनेने खडसे यांनी चार वर्षे प्रतीक्षा केली. इतकेच नव्हे तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीदेखील चमत्कार घडेल, असे वाटत असताना त्यांनी उमेदवारी दाखल केली. मात्र, त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळालाच नाही व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला. कन्येच्या पराभवानंतर तर खडसे यांनी जळगाव असो की, अन्य ठिकाणी भाजपच्या राज्य पातळीवरील नेतृत्वावर टीका केली. यात गोपीनाथ गडावरील आपल्या भाषणातदेखील खडसे यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखविली होती व तेथेदेखील पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा जाणीवपूर्वक पराभव केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांची ही नाराजी लपून राहत नव्हती.
उमेदवारीच्या केवळ चर्चा
गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपकडून इतर नेत्यांसह एकनाथ खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात होते. त्या वेळीदेखील नाराजी व्यक्त करीत विधान परिषदेसाठी ठिक आहे, मात्र राज्यसभेत काय करायचे. त्यासाठी मी उमेदवारी मागितलीदेखील नाही, असे असले तरी ही उमेदवारीदेखील मिळेल तेव्हा मिळेल, ते काही खरे नाही व उमेदवारीबाबतही आपला अनुभव चांगला नसल्याचे ते म्हणाले होते.
पुन्हा एकदा अनिश्चितता
भाजपमधील नाराजीनंतर खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना कृषी खाते देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, साडेआठ महिन्यांनंतरही खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये कोणतेही पद मिळू शकले नाही. आता विधान परिषदेच्या १२ जागांसाठी खडसे यांचेदेखील नाव असल्याचे जाणकार सांगत आहेत. मात्र, या हालचाली सुरू असतानाच खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यात आता पुढे आणखी ही कारवाई कोणाकडे वळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसही खडसे यांच्या प्रवेशापासूनच सावध भूमिका घेत असून, त्यांना राज्य असो की जिल्हा पातळीवरीलही पद दिले नाही. आता तर कारवाई घरात पोहोचली असल्याने विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत पक्ष अधिकच विचार करणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.