भोणे येथे ढगफुटीसदृश पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:36 AM2018-06-29T00:36:48+5:302018-06-29T00:37:23+5:30
वरखेडी : परिसरात वादळी पाऊस, बिडगावला दुकानांमध्ये पाणी, अजूनही अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टीची प्रतीक्षा
जळगाव : जिल्ह्यातील विविध भागात गुरुवारी कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. धरणगाव तालुक्यातील भोणे येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. वरखेडी परिसरात वादळी पाऊस होऊन घरांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी अजूनही अनेक ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
धरणगाव शहरासह तालुक्यात २८ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. पेरणी झाल्यानंतर आलेल्या पावसामुळे पिकांना अंकुर फुटण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
धरणगाव तालुक्यात २८ रोजीपावेतो ११७.१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. पहिला पाऊस बºयापैकी झाल्याने शेतकºयांनी लगबगीने पेरण्या केल्या होत्या. रोज भरुन येणारा पाऊस हवेमुळे हुलकावणी देऊन निघून जात असे. २८ रोजी मात्र पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे.
भोणे परिसरात ढगफुटीचा अनुभव
धरणगाव तालुक्यातील भोणे परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे तेथील नागरिकांना ढगफुटीचा अनुभव आला. या पावसामुळे तेथील नदी तुडूंब भरुन दुथडी वाहू लागली. तसेच शेतांमध्ये पाणी भरभरुन वाहत होते.
गेल्यावर्षी भोणे ग्रामस्थांनी लोकवर्गणी व लोकसहभागातून राष्टÑीय स्वयसेवक संघाच्या सहकार्याने तेथील नदी खोलीकरणाचा उपक्रम राबविला होता. त्यामुळे नदी पात्रात गेल्या वर्षी तुडूंब पाणी होते. त्यामुळे गावाला पाणीटंचाईची झळ बसली नाही. यावर्षी २८ रोजी झालेल्या पावसाने नदी खोलीकरण केलेले पात्र फुल्ल भरल्याने विहिरींना आता लाभ होणार आहे. कयनी नदीच्या खोलीकरणासाठी जलविधी देवगिरी प्रांतप्रमुख चिंतामण पाटील, कृउबा संचालक दिनेश पाटील व लोण्याचे प्रताप पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले होते.
भोणे गावाचा आदर्श घेत लोणे व महंकाळे या गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या गावात यावर्षी नदी खोलीकरण केले आहे.