महामार्ग अपघात कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:45+5:302021-05-29T04:13:45+5:30
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्वच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चौपदरीकरणादरम्यान रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी ...
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्वच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चौपदरीकरणादरम्यान रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी खोदकाम करून दोन ते तीन महिने उलटले तरी, पुढील काम सुरू केले जात नाही. वाहनचालकांसह परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. खोदलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत म्हणून भुसावळ शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती.
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनसुद्धा उपाययोजना केल्या नाही. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख ॲड. श्याम श्रीगोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख नीलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे व इतर पदाधिकारी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
मार्च महिन्यात खोदकाम केले पण, त्यानंतर अत्यंत संथपणे रस्त्यांचे काम होत आहे. अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. हे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा नागरिकांसमवेत आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. संथ गतीने होणाऱ्या या कामास पूर्णत: महामार्ग प्राधिकरण प्रशासन जबाबदार आहे.
-संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख
खड्ड्यांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा कठडा नसल्याने शेख जावेद यांची दुचाकी खड्ड्यात पडली, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. नुकसान भरपाईसह उपचाराचा खर्च महामार्ग प्राधिकरणाने देणे अपेक्षित आहे.
-प्रा.धीरज पाटील, शिवसेना तालुका संघटक, भुसावळ