सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:38 PM2021-03-31T23:38:40+5:302021-03-31T23:41:04+5:30

मुदत संपलेल्या ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा खो मिळण्याची शक्यता आहे.

Co-operative elections to be postponed again? | सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार?

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार?

Next
ठळक मुद्देचाळीसगावातील ८२ संस्था. ५१ विविध कार्यकारी सोसायटी, २५ पतसंस्था, शैक्षणिक संस्थांचाही समावेश.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : कोरोनामुळे तालुक्यातील मुदत संपलेल्या ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत यापूर्वीच  पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता या निवडणुकांना पुन्हा खो मिळण्याची शक्यता असून, ३० जूननंतर या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची स्थिती असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बहुतांशी संस्थांनी बुधवारी ३१ मार्चअखेर ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा उरकल्या आहेत.

मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. ५१ विविध कार्यकारी सोसायट्यांसह राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ, आदी शैक्षणिक संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. २५ पतसंस्थांचा देखील यात समावेश आहे. उंबरखेडे येथील सर्वोदय शिक्षण संस्थेसाठी मात्र येत्या दोन मे रोजी मतदान होत असून, या संस्थेची निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशान्वये यापूर्वीच सुरू झाली आहे.  

दरम्यान कोरोनाच्या स्थितीमुळे सध्या सर्वच ठिकाणी हाहाकार उडाला असून त्याचा परिणाम आता निवडणुकांवरही झाला आहे.

जिल्ह्यातील १११८ सहकारी संस्था

३१ डिसेंबर २०२० रोजी मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १११८ संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत येत्या एक ते दोन दिवसांत आदेश निघणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा बँक, दूध संघ अशा मोठ्या संस्थांचा यात समावेश आहे. अ गटातील ६, ब - ४४९, क - ४५९, ड - २०४ अशा एकूण १११८ संस्था आहेत. २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या अ गटातील एक, तर ब - २४७, क - १९५, ड - १२० अशा एकूण ५७५ संस्थांचा निवडणूक धुरळा कोरोनामुळे ‘वेटिंग’वर आहे.

‘सर्वोदय’साठी पुन्हा प्रचाराची रणधुमाळी

उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेची निवडणूक २१ मार्च रोजीच पार पडणार होती. मात्र पॅनलमधील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने निवडणुकीसाठी २ मे रोजी मतदान होत असून, ३ मे रोजी निकाल जाहीर होतील. दरम्यान, यापूर्वी उमेदवारी दाखल केलेल्या इच्छुकांव्यतिरिक्त अन्य इच्छुकांना नव्याने जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमामुळे अर्ज दाखल करता येणार आहे. पुन्हा प्रचारासह मतदारांच्या भेटीगाठीची रणधुमाळी रंगणार आहे. १९ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. ५१३० एकूण सभासद आहेत.

५१ विविध कार्यकारी सोसायट्या

उंबरखेडे, पिंपळगाव, नांद्रे, मुंदखेडे, रहिपुरी, शिवापूर, बोरखेडे, पिंपळवाड म्हाळसा, भवाळी, खडकीसीम, कुंझर, घोडेगाव, माळशेवगे, मुंदखेडे बु., वलठाण, वडगाव लांबे, आडगाव, वरखेडे बु., अलवाडी, भोरस बु., डोण, खेडगाव, शिवाजी उंबरखेडे, भऊर, चाळीसगाव, दहिवद, जामदा, तळेगाव, वाकडी, कळमडू, शिरसगाव, धामणगाव, हातले, खरजई, ओढरे, पिंपरखेड, न्हावे, पिंप्री प्र.दे., ब्राम्हणशेवगे, चिंचखेडे, पोहरे, शिंदी, सायगाव, वाघळी, वडाळा - वडाळी, लोंढे, करजगाव, वाघडू आदी ५१ विविध कार्य. सोसायटीच्या निवडणुका सहा टप्प्यांत होणार होत्या. मात्र, यांनाही खो मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Co-operative elections to be postponed again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.