‘बीएचआर’वर कारवाईबाबत सहकार मंत्र्यांवरही दबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:42 PM2019-05-09T12:42:26+5:302019-05-09T12:43:01+5:30
एकनाथराव खडसे यांचा गौप्यस्फोट
जळगाव : बीएचआर पतपेढीतील बेकायदेशीर व्यवहार, मनी लाँड्रींग व मालमत्तेची कमी दरात ठराविक लोकांकडून खरेदीकरून सुमारे हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याची तक्रार ठेवीदारांच्यावतीने करण्यात आली आहे. असे असले तरी बीएचआर पतपेढीवर कारवाई होत नसून या प्रकरणात खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरदेखील दबाब असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी जळगाव येथे केला. या प्रकरणी कारवाई सुरू झाल्यास किमान १०० ते १२५ दिग्गज मंडळी तुरुंगात जातील, असा दावा करीत त्यांची यादीही आपल्याकडे असल्याचे खडसे म्हणाले.
बीएचआर पतपेढी ही मल्टीस्टेट पतपेढी असल्याने तिचे नियंत्रण हे केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. या पतपेढीतील गैरव्यवहाराची तक्रार ठेवीदारांच्यावतीने अॅड.कीर्ती रवींद्र पाटील यांनी थेट पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत या पतपेढीची ईडीमार्फत चौकशी करण्यासोबतच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फेही चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशांनंतरही कार्यवाही मात्र थंडबस्त्यात असल्याने व याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिल्याने या बाबत आश्चर्य व्यक्त करीत खडसे यांनी बुधवारी या विषयी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्राचे आदेश असतानाही सहकार मंत्री सुभाष देशमुख हे कारवाई करीत नसल्याने आपण त्यांची भेट घेऊन त्यांना या बाबत विचारले असता कारवाई करू शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे या प्रकरणात सहकार मंत्रीच दबावात असल्याचेही ते म्हणाले.
इतकेच नव्हे तर पतसंस्थेचे प्रशासक जितेंद्र कंडारे यांच्याकडून पदभार काढण्याचे आदेश असताना त्यांना पाठिशी घातले जात असून अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बदलीची मागणी केली तरी त्यांची बदली होत नसल्याने यामध्ये किती दबाब आणला जात आहे, याचा अंदाज येऊ शकतो, असेही खडसे म्हणाले.
१०० ते १२५ जण जातील तुरूंगात
या प्रकरणाची चौकशी झाल्यास यात १०० ते १२५ दिग्गज तुरुंगात जातील असे सांगत त्यांची यादीही आपल्याकडे असल्याचे खडसे म्हणाले.
‘महावीर अर्बन’ च्या संचालकांवर कारवाई
श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीने १७ वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा सहकारी बँकेकडून घेतलेले आठ कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याने व सदर कर्जाची हमी घेतलेल्या संचालकांनी दिलेल्या धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी बँक संबंधित १० संचालकांच्या मालमत्तेवर बोझा लावणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. या संचालकांमध्ये माजी आमदार मनीष ईश्वरलाल जैन यांचाही समावेश आहे.