आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडवणारे प्रशिक्षक अजित घारगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:16+5:302021-07-26T04:16:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू जळगावमध्ये घडवणारे प्रशिक्षक म्हणून अजित घारगे यांची ओळख आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू जळगावमध्ये घडवणारे प्रशिक्षक म्हणून अजित घारगे यांची ओळख आहे. घारगे यांनी चैतन्य इनामदार, अंकिता पाटील यांच्यासारखे खेळाडू घडवले आहेत.
१९९७ मध्ये अजित घारगे हे मार्शल आर्टच्या स्पर्धेसाठी नेपाळला गेले होते. तेथे त्यांची तायक्वांदो या खेळाशी ओळख झाली. त्यांनी त्याचे प्रशिक्षण सातारा येथे घेतले. त्यानंतर पुण्यात स्व. विजय इनामदार यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतले. नंतर १९९९ पासून जळगावला तायक्वांदो शिकवायला सुरूवात केली. २००१ मध्ये त्यांच्या जळगाव जिल्हा तायक्वांदो संघटनेला राज्य असोसिएशनने मान्यता दिली. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक उत्तम खेळाडू घडवले. त्यांनी आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय तर २५ पेक्षा जास्त राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. चैतन्य इनामदार याने दक्षिण आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. तर इंडिया ओपनमध्ये त्याने रौप्य पदक पटकावले. त्यासोबतच २०११ च्या राष्ट्रीय स्पर्धेत तृप्ती तायडे हिने कांस्य तर २०१५ च्या केरळच्या राष्ट्रीय स्पर्धेत अंकिता पाटील हिने कांस्य पदक पटकावले होते. त्यासोबतच कोमल महाजन, सागर ठाकणे, श्रेयांश खेकारे, शीतल रुले हे आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील घारगे यांनी घडवले आहे.
तायक्वांदोच्या पाच खेळाडूंनी जिल्हा क्रीडा पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. तसेच जयेश बाविस्कर याने तायक्वांदोत डिप्लोमा देखील पुर्ण केला आहे. सध्या जिल्हा संघटनेच्या माध्यमातून पाचोरा, चोपडा, रावेर, चाळीसगाव, जामनेर आणि जळगाव येथे तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे दिला जाणारा अजित घारगे यांना २०११ मध्ये जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. घारगे यांनी जिल्ह्यात पाच राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे यशस्वी आयोजन देखील केले आहे. २००४, २००५, २००८,२०१० आणि २०१७ मध्ये या स्पर्धा पार पडल्या.
हाताखाली नव्या दमाच्या प्रशिक्षकांची फौज असली तरी घारगे अजूनही स्वत: खेळाडूंना प्रशिक्षण देतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी खेळाडूंना ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर दिला होता. त्या काळात मानसिक स्वास्थ्यापासून शारीरीक तंदुरुस्ती कशी राखावी, यावर ते मार्गदर्शन करत होते. आता देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नियमीतपणे सरावासाठी टिप्स देत असतात.