कोयलने दिली साद, उठ बळीराजा कामाला लाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:18 AM2018-05-28T00:18:16+5:302018-05-28T00:18:16+5:30
भडगाव : शेती मशागतीच्या कामाला येतोय वेग, कापूस घटणार, तर मका, सोयाबीन वाढणार, मजुरांचे आतापासूनच एक महिन्याचे बुकींग
आॅनलाईन लोकमत
भडगाव, जि.जळगाव, दि. २७ : तालुक्याला सतत दुष्काळी मारा बळीराजाला सहन करावा लागत आहे. बोंडअळीचे अनुदान नाही. कर्जमाफीचा ताण यासह इतर चिंतांनी बळीराजा संकटात आहे. तालुका दुष्काळी असूनही शासनाचा आधार नाही. कर्जाचा डोंगर माथ्यावर आहे. खरीप हंगाम पेरणीची वेळ तोंडावर आली. काय करावे सुचेना? सध्या कोयल कुऽऽहू कुऽऽहु करीत शेतकऱ्याला जणू धीर देत आहे. ‘कोयलने दिली साद अन् उठ माझ्या बळी राजा कामाला लाग’ याप्रमाणे बळीराजा सध्या खरीप हंगाम पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामाला लागला आहे.
तापमान जास्त असूनही पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी तुरळक बागायती कापूस लागवड सुरू केली आहे. मागील वर्षी कापसाचे बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. परिणामी यंदा कापूस पिकाच्या लागवडीत घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र मका व सोयाबीन पेरा क्षेत्र वाढू शकतो, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
शेती मशागती कामे सुरू
पावसाळा तोंडावर आल्याने शेतकºयांनी तालुक्यात खरीप पेरण्यापूर्व मशागतींच्या कामांना शेतीबांधावर कचरा जाळून स्वच्छता करण्याची कामे सुरू केली आहे.
तालुक्यात मागील वर्षी सरासरी ४०७ मिलीमीटर पाऊस झाला. पाऊस कमी झाला होता. तालुक्यातील ३१ पाझर तलावात शेवटपर्यंत कुठे २० ते जेमतेम ५० टक्के पाणीसाठा जमा झाला. जमिनीची पाण्याची पातळी फारशी वाढली नाही. विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न यक्ष बनला आहे. मात्र गिरणा धरण पाण्याने चांगले भरल्याने गिरणा माईने गिरणा काठच्या काही गावांना तारले.
भौगोलिक क्षेत्र ४८ हजार ४४६ हेक्टर
तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ४८ हजार ४४६ हेक्टर आहे. पेरणीलायक क्षेत्र ४२ हजार १३१ हेक्टर आहे. मागील वर्षी २ जून २०१७ रोजी तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली होती. मागील वषीे खरीप हंगामाच्या पेरण्या एकूण ४२ हजार १३१ हेक्टरवर झाल्या होत्या.
नॉन बिटी कापूस बियाणे तालुक्यासाठी ९९ हजार ६५० पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. रासायनिक खतांच्या मागणीनुसार १९ हजार ८६८ मेट्रिक टन खते उपलब्ध झाले आहेत.