जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पाण्याअभावी कॉक्रिटला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:30 PM2019-02-04T22:30:59+5:302019-02-04T22:34:04+5:30
जळगाव-औरंगाबाद मार्गाचे सुरू असलेले काम पगार न मिळाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद पडले होते.
पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : जळगाव-औरंगाबाद मार्गाचे सुरू असलेले काम पगार न मिळाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद पडले होते. कामगारांना आश्वासन देऊन लवकरच पगार दिले जाईल, असे सांगून सोमवारी सकाळपासून कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु ऋतिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडून श्रीकृष्ण कंट्रक्शन यांनी महामार्गावर मुरूम दबाई, पूल, खडी वाहतूक, राख सप्लाय यासह छोटे-मोठे काम श्रीकृष्ण कन्सट्रक्शन यांनी घेऊन महामार्गावरील मुरूम टाकून दबाई करून काम पूर्ण करून गेल्या सहा-सात महिन्यांपासून कंपनीने मजुरांना देण्यासाठी ठेकेदारांना पैसे न दिल्यामुळे महामार्गाचे काम पुन्हा बंद पाडले. कंपनी आमचे पैसे देत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे.
श्रीकृष्ण कन्सट्रक्शन या ठेकेदाराचे ३५ लाख रूपयांचे ऋतिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे घेणे आहे. याशिवाय अक्षय पाटील-मगर, शुभम पाटील-आन्वीकर यांच्यासह पाच ते सहा ठेकेदारांचेही पैसे या कंपनीकडे अडकलेले आहेत. गेल्या सात ते आठ दिवसांपासून काम बंद असल्यामुळे महामार्गावरील काँक्रिटचे रस्ते व पूल यावर पाणी न मारल्यामुळे या कामांना तडे गेल्याचे आढळून आले आहे.
जोपर्यंत कंपनी पैसे देत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, अशा भूमिकेत ठेकेदारांनी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण कुमार यांना ठामपणे सांगितले आहे.
या भूमिकेवर ठेकेदार व मजूर ठाम असल्यामुळे याचा त्रास मात्र वाहनचालक यांना सोसावा लागत आहे. निर्माणाधीन रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर धुळीचा त्रास वाहनधारकांसह ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यावर पाण्याचा मारा करणे आवश्यक असताना मजुरांअभावी निर्माणाधीन रस्त्यावर पाणी मारले जात नाही. परिणामी रस्त्याचा दर्जा खालावण्याची भीती निर्माण झाली आह़े़
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी नसल्याने रस्त्याला व नुकत्याच बांधकाम झालेल्या पुलांना तडे जात आहेत. याबाबत ग्रामस्थ व प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
पहूर ते वाकोद दरम्यान महामार्गाच्या रस्त्याचे खोदकाम थांबवून जि.प. सदस्य अमित देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पहिले पाळधी ते नेरी दरम्यान सुरू असलेले काम पूर्ण करा. नंतर इकडे कामाला सुरुवात करा, अशा सूचना दिल्या. संपूर्ण महामार्ग खोदून ठेवला तर वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे व छोटे-मोठे अपघात होत आहे म्हणून तिकडील काम जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी बंद पाडले.
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आम्ही कंपनीकडे काम केलेले आहे. काम करीत असताना कंपनीने आमच्याकडून चांगल्या प्रकारचे काम करून घेतले, पण आज पैसे मागायला गेले असता कंपनीचे अधिकारी अरेरावीची भाषा वापरत आहेत. कंपनीकडे ३५ लाख रुपये थकलेले आहे व पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत कंपनीचे कोणतेही काम कुठेही चालू दिले जाणार नाही.
-शुभम पाटील-आन्वीकर, ठेकेदार