आमदार निधीच्या खर्चाला आचारसंहितेचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:56+5:302021-01-01T04:11:56+5:30
जळगाव : जिल्ह्यातील ११ विधानसभा सदस्य आणि एक विधान परिषद सदस्य यांना प्रत्येकी २ कोटींचा निधी असे एकूण २४ ...
जळगाव : जिल्ह्यातील ११ विधानसभा सदस्य आणि एक विधान परिषद सदस्य यांना प्रत्येकी २ कोटींचा निधी असे एकूण २४ कोटी रुपये जिल्ह्याला आमदार निधीतून मिळतात. यंदा कोरोनाच्या काळात या निधीतून ५० लाख रुपये प्रत्येक आमदाराला कोविडसाठी खर्च करण्याची मुभा होती. तर सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे सध्या हा निधी खर्च होऊ शकत नाही; मात्र मार्चपर्यंत हा निधी वितरित होईल.
जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ आहेत तर आधी दोन विधान परिषद सदस्य होते; मात्र स्मिता वाघ यांच्या सदस्यत्वाची मुदत संपली. त्यामुळे चंदूलाल पटेल हेच सध्या जिल्ह्यातील विधान परिषदेचे सदस्य आहेत. स्मिता वाघ यांनीही कोविडसाठी आपल्या आमदार निधीचा वापर केला होता.
तर बहुतांश आमदारांनी ४० लाखांच्या वर खर्च केला आहे; मात्र आता कोविडनंतरच्या काळात हा आमदार निधी पुन्हा विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. त्यात बहुतांश आमदार स्थानिक विकास कामे करण्यावर भर देत आहेत.
लहान रस्ते, विद्युत पथदिवे या सोबतच विविध समाजांसाठी सामाजिक सभागृहे उभारणीची कामे करण्यावर आमदारांचा भर आहे; मात्र आता १८ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्या काळात कार्यादेश दिले जाऊ शकत नाही; मात्र नंतर मार्चपर्यंत उरलेला निधी खर्च केला जाऊ शकतो.
विकास कामांमध्ये आमदार विविध लहान रस्ते, गटारी यासारख्या कामांवर भर देतात. त्यासोबत विद्युत हायमास्ट लॅम्प, इतर पथदिवेदेखील होत आहेत.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे सध्या निधी खर्च होणार नाही; मात्र नंतर मार्चपर्यंत आमदारांचा उरलेला एक कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी खर्च होईल.
- प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी