'हा तर कोल्ड ब्लडेड मर्डर'; भाजपाने तडकाफडकी तिकीट कापल्यानं वाघ दाम्पत्य नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 01:42 PM2019-04-04T13:42:16+5:302019-04-04T19:15:11+5:30
जर तिकिट कापायचेच होते तर तिकिट द्यायलाच नको होते
जळगाव- पक्षाने आमच्यावर आधी विश्वास दाखविला. जर तिकिट कापायचेच होते तर तिकिट द्यायलाच नको होते, आता तिकिट का कापण्यात आले? हे का आणि कसे घडले, याबाबत चौकशी करण्याची मागणी वरिष्ठांकडे करणार आहोत. पक्षाने केलेला हा राजकीय कोल्ड ब्लडेड मर्डर आहे. अशी तीव्र प्रतिक्रिया जळगाव लोकसभा मतदार संघातून तिकिट कापण्यात आलेल्या भाजपच्या आमदार स्मिता वाघ व त्यांचे पती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यक्त केली.
पक्षाने तिकिट कापल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी वाघ दाम्पत्य पत्रकारांशी बोलत होते. पक्षाने तिकिट कापले तरी आमचा राष्ट्रीय व राज्य नेतृत्वावर विश्वास आहे. ते अजूनही आमचा विचार करतील, मात्र पक्षाने जो निर्णय दिला तो आम्हाला शिरसावंद्य राहील, असे त्या म्हणाल्या.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने आधी जाहीर केलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपाचे उन्मेष पाटील यांच्यात लढत होणार आहे.
दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी आज सकाळी आपल्या प्रचारासाठी एक लाख प्रचार पत्रके जळगाव मतदार संघात वाटल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या प्रचार पत्रकांवर स्मिता वाघ यांचे पती आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे नाव प्रकाशक म्हणून प्रसिद्ध करण्यात आले आहे.