पंधरवड्याचा ‘ब्रेक’नंतर थंडीचे पुन्हा आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:26+5:302021-01-15T04:14:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या पंधरादिवसांपासून जिल्ह्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून, दोनच दिवसात किमान तापमानात तब्बल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - गेल्या पंधरादिवसांपासून जिल्ह्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून, दोनच दिवसात किमान तापमानात तब्बल आठ अंशाची घट झाली असून, मंगळवारी १८ अंशावर असलेले किमान तापमान गुरुवारी १० अंशापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. मकर संक्रातीनंतर हळूहळू थंडी कमी होत जात असते, मात्र, यंदा मकर संक्रातीलाच थंडीचे आगमन झाल्याने वातावरण पुन्हा आल्हाददायक झाले आहे.
अरबी समुद्र व बंगालचा उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राजस्थान-मध्यप्रदेश लगत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाला होता. याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणात देखील पहायला मिळाला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना पुर्णपणे ब्रेक लागल्याने थंडीत मोठी घट झाली होती. किमान तापमान देखील १९ अंशापर्यंत पोहचले होते. मात्र, आता कमी दाबाचा पट्टा नाहीसा झाल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. यामुळे थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. यासह जिल्ह्यात हवेचा वेग देखील २० किमी प्रतीतास असल्याने दिवसा देखील गारवा जाणवत होता. अजून आठवडाभर थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.