थंडीचा कडाका आणखी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:54+5:302021-02-06T04:28:54+5:30
जळगाव - जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान थंडीचे प्रमाण कमीच राहिले, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात थंडीचा कडाका कमी होऊन ...
जळगाव - जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान थंडीचे प्रमाण कमीच राहिले, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात थंडीचा कडाका कमी होऊन उन्हाळ्याची चाहुल लागत असते. मात्र, यंदा चित्र वेगळेच पहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानाची सरासरी १२ अंश इतकी राहिली असून, गेल्या चार दिवसात किमान पारा ११ ते १२ अंशावर स्थिर आहे. दरम्यान, अजून आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. तर दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
गाढोद्यात रक्तदान शिबिर
जळगाव - गाढोदा येथे शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भजेगल्लीत पुन्हा फोफावले अतिक्रमण
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून भजे गल्लीतील अतिक्रमण गेल्या महिन्यात काढले होते. मात्र, महिनाभराच्या आत या भागात पुन्हा हातगाड्यांवरून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी आपले दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने या भागातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी केली जात आहे.
बायपासच्या कामाला वेग
जळगाव - महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाच्या कामाला अनेक वर्षांपासून सुरुवात झाली असून, गेल्या दोन वर्षांपासून थांबलेल्या व जळगाव शहरालगत जाणाऱ्या बायपासच्या कामालादेखील आता वेग आला आहे. गिरणा नदीवरील पुलाच्या कामाला दोन महिन्यांपूर्वीच सुरुवात करण्यात आली होती. आता आव्हाणे व ममुराबाद शिवारातील कामालादेखील सुरुवात झाली आहे. तसेच ‘नही’ने भूसंपादित केलेल्या जागेवर पेरणी केलेले पिके देखील आता ‘नही’कडून तोडण्यात येत आहेत.