शॉर्टसर्किटमुळे शीतगृह, गोदामाला आग; एक दिवस अगोदरच आलेले २० लाखांचे आइस्क्रीम
By विजय.सैतवाल | Published: April 1, 2024 04:20 PM2024-04-01T16:20:58+5:302024-04-01T16:21:30+5:30
बिस्कीट खाक
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : आइस्क्रीम, बिस्कीट, चॉकलेट, चिप्स, मिरची पावडर, मसाले व इतर खाद्यपदार्थांचा साठा ठेवलेल्या शीतगृह, गोदामाला अचानक आग लागून संपूर्ण साठा जळून खाक झाला. यामुळे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना सोमवार, १ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहत परिसरात घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचे गोदाम मालकाचे म्हणणे आहे.
औद्योगिक वसाहत परिसरातील जी-३ सेक्टरमध्ये घाऊक व्यापारी राजेश कोठारी यांचे शीतगृह, गोदाम आहे. शहरातील किरकोळ विक्रेत्यांना विविध खाद्यपदार्थांचा पुरवठा ते करतात. यासाठी एक-दोन दिवसांतून त्यांच्याकडे माल येत असतो. त्यामुळे शीतगृह, गोदामात नेहमी विविध वस्तूंचा साठा असतो. त्यात आइस्क्रीम व इतर वस्तूंचा साठा आलेला असताना दुसऱ्याच दिवशी ही आग लागली.
रात्री गोदाम बंद करून कोठारी हे घरी गेलेले असताना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गोदामातून अचानक धूर येत असल्याचे सुरक्षा रक्षकाला दिसले. त्यावेळी त्याने लगेच कोठारी यांना याविषयी माहिती दिली. ते घटनास्थळी पोहोचले व पाठोपाठ अग्निशमन दलाचे बंबही दाखल झाले. मात्र, आग एवढी होती की त्यात सर्व जळून खाक झाले.
दीड तासानंतर आग नियंत्रणात
आग लागल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंद १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्याद्वारे फायरमन भरत बारी, पन्नालाल सोनवणे, नीलेश सुर्वे, मनोज पाटील, विजय पाटील, निवांत इंगळे, नंदू खडके यांनी ही आग विझविली. मात्र, आग एवढी वाढली होती की, तिच्या नियंत्रणासाठी दीड तास लागला.
आइस्क्रीमचे चार ते पाच हजार खोके जळाले
सध्या उन्हाळ्यामुळे आइस्क्रीमला चांगली मागणी वाढली असल्याने या हंगामासाठी आइस्क्रीमचा अधिक साठा मागवला जातो. त्यानुसार कोठारी यांच्या शीतगृहात आइस्क्रीमचा मोठा साठा होता. या आगीत १० लाख रुपये किमतीचे आइस्क्रीमचे चार ते पाच हजार खोके जळून खाक झाले. एकूण नुकसानापैकी निम्म्या नुकसानाची रक्कम आइस्क्रीमचीच असल्याचे सांगण्यात आले.
मागे कारचे शोरुम
ज्या गोदामाला आग लागली त्याच्या मागे कारचे शोरुम आहे. ही आग मागे पसरत न गेल्याने व वेळीच ती नियंत्रणात आल्याने कारचे शोरुम सुरक्षित राहिले.