जळगाव जिल्हा रुग्णालयात कोल्ड स्टोअरेज युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:31 PM2020-01-14T12:31:55+5:302020-01-14T12:33:33+5:30
दोन वर्षांची प्रतीक्षा संपली : विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध होतील मृतदेह
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज युनिट (फोर बॉडी मरच्युरी कॅबिनेट) उपलब्ध झाले मृत्यूनंतर देहदानाविषयीच्या जनजागृतीला प्रारंभ करण्यात आला आहे़ दोन वर्षांनी प्रथमच रूग्णालयात देहदान जागृतीविषयी फलक झळकले आहे़ लवकरच ‘मृत्यूनंतर देहदान समिती’ची बैठक होणार असल्याची माहिती आहे़
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमासाठी तसेच संशोधनासाठी आवश्यक असणारे मृतदेह हे मुंबई किंवा औरंगाबाद येथून उपलब्ध केले जात होते़ स्थानिक पातळीवर ठेवण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नव्हती़ स्थानिक पातळीवरच हे मृतदेह उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक असलेले कोल्ड स्टोरेज युनीट आॅगस्ट महिन्यात मंजूर झाले होते़
मात्र, ते उपलब्ध झालेले नव्हते़ दहा लाखांच्यावर किमंत असल्याने ही सर्व प्रक्रिया मंत्रालय स्तरावरून झाली़ मृतदेह ठेवण्यासाठी हे युनीट नसल्याने देहदान समिती असूनही नसल्यासारखी होती व जनजागृतीचे साधे फलकही रूग्णालयात नव्हते़ आता युनीट आल्यानंतर फलक लावून सुरूवात करण्यात आली आहे़
लवकरच समितीची बैठक
देहदान समितीच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे, सदस्य सचिव वैद्यकीय अधीक्षक डॉ़ किरण पाटील, शरीररचना शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा़ अरूण कासोटे, मानसशास्त्रज्ञ डॉ़ दौलत निमसे, सामाजिक कार्यकर्ता राहुल बºहाटे आदींचा समावेश आहे़
बेवारस मृतदेहही ठेवता येणार
रूग्णालयात अनेक वेळा बेवारस मृतदेह येतात पोलिसांनी परवानगी दिल्यास व मृत्यू झालेल्या व्यक्तिचे कोणीही वारस नसल्यास असे मृतदेह या युनीटमध्ये ठेवून त्यांचाही अभ्यासक्रमासाठी वापर होणे शक्य होणार आहे़ असेही अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी सांगितले़
काय आहे युनीट
रात्री अपरात्री एखादा मृतदेह आल्यानंतर ते तात्पुरत्या स्वरूपात या युनीटमध्ये ठेवता येणार आहे़ त्यानंतर त्यावर रासायनीक प्रक्रिया करून तो मृतदेह अधिक कालावधीसाठी टँकमध्ये ठेवता येणार आहे़
देहदान ही कोणतीही महिला, पुरूष करू शकतात, देहदानासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही, यासाठी मृत्यूपूर्व प्रतिज्ञापत्र भरून देणे बंधनकारक नाही, मृत इसमाचे कायदेशीर वारस मृत शरीराचे देहदान करू शकतात़ अशी माहिती या फलकावर देण्यात आली आहे़
आपल्याकडे मृतदेह ठेवण्याची सोय नसल्याने आपण देहदान स्वीकारत नव्हतो़ मात्र, ती सोय आता उपलब्ध झाली आहे़ समितीच्या सदस्यांसह औपचारीक चर्चा करून रूग्णालयाच्या विविध ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले आहेत.
- डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता