जळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल इतिहास जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:01 PM2019-04-10T12:01:03+5:302019-04-10T12:01:33+5:30
सचखंड एक्सप्रेसमुळे दीड तास उशिरा मेगाब्लॉक
जळगाव : शिवाजीनगर पुलावरील अतिशय जोखमीचे असलेले गर्डर काढण्याचे काम रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन तासात पूर्ण केले. पुलावरील गर्डर काढण्यात आल्याने १०५ वर्ष जुना ब्रिटीशकालीन हा पूल इतिहास जमा झाला. महाकाय मोबाईल क्रेनच्या सहाय्याने अवघ्या ९० मिनिटांत ९ मीटरचे ४ तर २० मीटरचे २ गर्डर काढण्यात आले. काम पूर्ण होताच अधिकाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.
गर्डर काढण्यासाठी पहिल्यादांच रेल्वेची प्रचंड यंत्रणा जळगावात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
शिवाजीनगर पुलावरील मंगळवारी गर्डर काढण्यासाठी मुंबईहून २५० टन क्षमतेच्या दोन तर ३५० टन क्षमतेची एक क्रेन मागविण्यात आली होती. यासाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला.
संपूर्ण कामाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण
शिवाजीनगर उड्डणपुलावरील गर्डर काढण्याच्या कामाचे सुरुवातीपासून ते काम संपेपर्यंत ड्रोन कॅमेºयाद्वारे चित्रीकरण करण्यात आले. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरक्षिततेसाठी हे चित्रीकरण करण्यात आले असून रेल्वेच्या अधिकाºयांना माहितीसाठी ते दाखविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.
मेगाब्लॉकची प्रतीक्षा
मुंबईच्या रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी सकाळी पुण्याहून नागपूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गेल्यानंतर सकाळी नऊ वाजेपासून मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र, संचखंड एक्सप्रेस साडेतीन तास उशिराने धावत होती. ही गाडी सकाळी १०.१५ वाजता गेल्यानंतर १०.३५ वाजता मेगाब्लॉक घेण्यात आला.