२५ दिवसात ८७६ बाटल्या संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:07+5:302020-12-26T04:13:07+5:30
जळगाव : सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याचे मध्यंतरी चित्र होते. आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक होता. यात रक्तदात्यांनी ...
जळगाव : सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याचे मध्यंतरी चित्र होते. आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक होता. यात रक्तदात्यांनी पुढे यावे, रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मध्यंतरी केले होते. त्याला प्रतिसाद देत जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांनी पुढाकार घेत तीन रक्तपेढ्यांमार्फत गेल्या पंचवीस दिवसात ८७६ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले आहे. यामुळे रक्तसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
कोरोनाकाळात शिबिरांवर मर्यादा असल्याने शिवाय दात्यांचेही प्रमाण कमी असल्याने रक्तसाठ्यावर मोठा परिणाम झाला होता. ऐनवेळी रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागत होती. अशातच बरेच नियम शिथिल झाल्यानंतर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा रक्तसाठा वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातही या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सरासरी रोज एक कॅम्प आणि त्याद्वारे मोठा रक्तसाठा संकलीत केला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ११ डिसेंबर रोजी सर्व रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्यासंदर्भात आढावा घेतला होता. त्यावेळी आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा होता. त्यामुळे रक्तसंकलन वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या होत्या.
तीन रक्तपेढ्यांचा पुढाकार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय रक्तपेढीद्वारे ३८४, रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीद्वारे २८२, तर गोळवलकर रक्तपेढीद्वारे २१० बाटल्या रक्त या महिनाभराच्या कालावधीत संकलीत करण्यात आलेले आहेत.
पुरेसा साठा
रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत २४ डिसेंबरपर्यंत ६३५ बॅग्स
गोळवलकर रक्तपेढीत ४ डिसेंबरपर्यंत १५३ बॅग्स
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीत ८२ बॅग रक्तसाठा उपलब्ध आहे.
विविध कार्यक्रमांना रक्तदान शिबिरे
बबलू पिपरिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, किसान महाविद्यालय पारोळा, समस्त लाडवंजारी समाज मेहरुण, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र, कावेरी ऑटो मोबाइल। भारत पेट्रोलियम शेंदूर्णी, एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, पीपल्स को- ऑपरेटिव्ह बँक, औष्णिक विद्युत केंद्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आयटीआय आदी संस्था आणि कार्यक्रमानिमित्त ही रक्तदान शिबिरे घेण्यात आली आहेत.