विवस्त्र करुन २८ विद्यार्थ्यांची सामूहिक रॅगिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 07:02 PM2019-10-13T19:02:08+5:302019-10-13T19:03:30+5:30

जळगावच्या इकरा युनानी महाविद्यालयातील प्रकार : तीन विद्यार्थ्यांची हकालपट्टी

Collective ragging of 5 students by dressing up | विवस्त्र करुन २८ विद्यार्थ्यांची सामूहिक रॅगिंग

विवस्त्र करुन २८ विद्यार्थ्यांची सामूहिक रॅगिंग

Next

जळगाव : सिनियर विद्यार्थ्यांकडून २८ विद्यार्थ्यांची सामूहिक रॅगिंग करीत त्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जळगावच्या इकरा युनानी महाविद्यालयात उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची महाविद्यालयातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
मुदस्सर मुख्तार इनामदार ( १९, रा.परभणी) या विद्यार्थ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्याला शासकीय कोट्यातून शहरातील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शुक्रवारी मुदस्सर याला पालकांनी वसतिगृहात दाखल केले. यानंतर शनिवारी त्यांच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या रुममध्ये होते. यावेळी १५ ते २० सिनीयर्स विद्यार्थ्यांनी पहाटे दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला.

सिनेमातील पात्र करायला लावले
मुदस्सर याने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजता काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्या प्रमाणे अ‍ॅक्टिंग करण्यास सांगून नंतर एकेक विद्यार्थ्यांची ओळख-परेड घेतली. यावेळी मुदस्सर याला काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळ देखील केली. त्याने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. तसेच खिशातील १८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्यास सांगितले, अन्यथा हीच ट्युबलाईट अंगावर फोडू, असे धमकावण्यात आले. हा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सर याने हॉलमधून पळ काढत स्वत:ची सुटका करुन घेतली.

सुरक्षा रक्षकाच्या मदतीने साधला वडीलांशी संपर्क
रॅगिंग करणाऱ्यांपासून सुटका केल्यानंतर मुदस्सर याने सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पालकांना फोन करुन माहिती दिली. त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. प्राचार्य डॉ.शोएब शेख यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुदस्सरचे वडील मुख्तार इनामदार व भाऊ डॉ़ मुजक्कीर हे महाविद्यालयात पोहचले. महाविद्यालयाने घडलेला प्रकार मान्य करत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. दरम्यान, मुदस्सर याचा मोबाईल व रोख रक्कम काही जणांनी लांबविला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

राष्ट्रीय अ‍ॅन्टी रॅगिंंग समितीकडे तक्रार
मुदस्सर याने पहाटे ३.४४ वाजेच्या सुमारास दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे मेलव्दारे तक्रार केली. रविवारी सकाळी ८.५१ वाजता तक्रारीची नोंदणी झाल्याचा मेल आला. अ‍ॅन्टी रॅगिंग समितीकडून तक्रारीची दखल घेवून महाविद्यालयास कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले़
यादरम्यान प्राचार्यासह पालकांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणेही गाठले होेते. राष्ट्रीय अँन्टी रॅगींग समितीच्या सुचनेनुसार प्राचार्य डॉ. शेख यांनी विद्यालयाच्या कार्यालयात सर्व २८ मुलांचे लेखी जबाब नोंदवून घेतले.

उर्दूतून दिला अहवाल
महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी मुदस्सर यांच्यासह वडील व भाऊ यांनी रविवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल सुध्दा त्यांच्याकडे होता़ परंतु, अहवाल हा उर्दू भाषेत असल्यामुळे तो मराठीतून आणवा व नंतर तक्रार दाखल करून चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले़ त्यामुळे मुदस्सर हा कुटूंबासह पुन्हा महाविद्यालयाच्या दिशेने परतला. दरम्यान, या प्रकाराची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरूंकडेही तक्रार करण्यात आली आहे़
मुदस्सरचे वडील परभणी येथे होमगार्ड समादेशक म्हणून कार्यरत आहेत.

महाविद्यालयात झालेला रॅगिंंगचा प्रकार चुकीचा आहे़ विद्यार्थ्याच्या सांगण्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली त्या तीन विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे़ याबाबत संबंधित विद्यार्थ्याने पोलिसात व अ‍ॅन्टी रँगिंग समितीकडेही तक्रार केली असून प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.
- डॉ़ करीम सालार, संस्थापक अध्यक्ष, इकरा संस्था
 

Web Title: Collective ragging of 5 students by dressing up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.